fire in Delhi | दिल्लीच्या अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत अग्नितांडव! ११ जणांचा होरपळून मृत्यू, पोलीस कॉन्स्टेबलसह ४ जखमी | पुढारी

fire in Delhi | दिल्लीच्या अलीपूर येथील पेंट फॅक्टरीत अग्नितांडव! ११ जणांचा होरपळून मृत्यू, पोलीस कॉन्स्टेबलसह ४ जखमी

पुढारी ऑनलाईन : उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील दयालपूर मार्केटमधील एका पेंट फॅक्टरीला गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली होती. यात आतापर्यंत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर एका पोलीस कॉन्स्टेबलसह ४ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळी बचावकार्य आणि शोधमोहीम सुरू आहे. दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “फॅक्टरीत आणखी २ लोक अडकले असण्याची शक्यता आहे.”

दिल्ली अग्निशमन सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजता दयाल मार्केटमध्ये आग लागली. यात एका पोलीस कॉन्स्टेबलसह ४ जण जखमी झाले. या दुर्घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून मृतदेह बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. ज्योती (वय ४२), दिव्या (२०), मोहित सोलंकी (३४) आणि दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल करंबीर अशी चार जखमींची नावे आहेत.

जखमींना राजा हरीश चंद्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. “आग दोन पेंट आणि केमिकल गोदामांना लागली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४ जण जखमी झाले,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास लागली. ही आग दोन गोदामांतून मार्केटमधील सुमारे ८ दुकानांमध्ये पसरली. प्रत्यक्षदर्शी सुमित भारद्वाज म्हणाले, “ही घटना संध्याकाळी ५.३० च्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज ऐकून सर्वजण येथे जमा झाले. आम्ही आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. सुमारे ७-८ अग्निशमन दलाच्या गाड्या येथे पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरू केले.”

सुनील ठाकूर म्हणाले की, “मी माझा भाऊ अनिल ठाकूर याला शोधण्यासाठी येथे आलो आहे. पण मला तो सापडला नाही. तो पेंट फॅक्टरीत होता. त्याच्याबाबत कोणतीही माहिती नाही. संध्याकाळी ५ वाजल्यापासून त्याचा फोन बंद आहे”.

हे ही वाचा : 

 

Back to top button