Kisan Andolan : शेतकर्‍यांना ‘चलो दिल्‍ली’ची हाक देणारे सरवन सिंग पंढेर कोण आहेत? | पुढारी

Kisan Andolan : शेतकर्‍यांना 'चलो दिल्‍ली'ची हाक देणारे सरवन सिंग पंढेर कोण आहेत?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी ) आणि इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचा मोर्चा आज (दि.१३) दिल्लीत धडकणार आहे. केंद्र सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या संपूर्ण आंदोलनाचा नेता म्हणून सर्वन सिंग पंढेर यांचे नाव पुन्‍हा एकदा समोर येत आहे. यापूर्वी २०२१ मध्‍ये दिल्‍लीत झालेल्‍या शेतकरी आंदोलनावेळीही त्‍याच्‍या नावाची चर्चा झाली होती. ( Kisan Andolan : Know About Farmer Leader Sarwan Singh Pandher ) जाणून घेवूया त्‍याच्‍याविषयी…

Kisan Andolan : विद्यार्थीदशेपासूनच चळवळींमध्ये सहभाग

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील पंढेर हे सर्वन सिंग पंढेर यांचे मूळ गाव. विद्यार्थीदशेपासूनच त्‍यांचा चळवळींमध्ये सहभागी राहिला आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ते किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस असा त्‍याच्‍या आजवरचा शेतकरी संघटनामधील प्रवास आहे. किसान संघर्ष समितीपासून वेगळे होत सतनाम सिंह पन्नू यांनी २००७ मध्ये किसान मजदूर संघर्ष समितीची स्थापना केली होती. आज सर्वनसिंह पंढेर हे याच किसान मजदूर संघर्ष समितीचा प्रमुख चेहरा आहेत. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले ४५ वर्षीय सर्वनसिंग हे आपले विचार ठामपणे मांडतात. ( Kisan Andolan : Know About Farmer Leader Sarwan Singh Pandher )

आपल्‍या मतांवर आग्रही राहणारे शेतकरी नेते

किसान मजदूर संघर्ष समितीचे कार्यक्षेत्र अमृतसर आहे. पंजाबमधील सात-आठ जिल्ह्यांतील शेतकरी आणि शेतमजूर यांच्‍या हक्‍कांसाठी लढा देणारी संघटना अशीही या संघटनेची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या अधिकार्‍यांबाबत लढा देत असली तरी अन्‍य शेतकरी संघटनांपेक्षा वेगळी राहण्याचा प्रयत्न ही संघटना करते. आपल्‍या मतांवर आग्रही राहणारे शेतकरी नेते अशीही सर्वनसिंग पंढेर यांची ओळख आहे. आम्ही कोणाच्‍याही दबावाखाली न येता शेतकर्‍यांच्‍या न्‍यायहक्‍कांसाठी लढा देण्‍याचा प्रयत्न करतो, असा दावा ते नेहमीच करतात.

२०२१ मधील प्रजासत्ताक दिन ट्रॅक्‍टर परेडनंतर सर्वनसिंग आले होते चर्चेत

२६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्‍टर परेडचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारानंतर सरवनसिंग पंढेर यांचे नाव समोर आले होते. त्‍यावेळी काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी सर्वनसिंग पंढेर यांनीच शेतकर्‍यांना भंडकवल्‍याचा आरोप केला होता. मात्र, या हिंसाचारानंतर पढेर यांनी माफी मागितली होती.

हेही वाचा :

 

 

Back to top button