कुत्र्याच्‍या मालकाकडे बिस्‍किट दिले, यात भाजपचे काय नुकसान झाले? राहुल गांधींचे प्रत्‍युत्तर | पुढारी

कुत्र्याच्‍या मालकाकडे बिस्‍किट दिले, यात भाजपचे काय नुकसान झाले? राहुल गांधींचे प्रत्‍युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुत्रा बिस्कीट खात नाही तेव्हा काँग्रेस खासदार ते शेजारी उभ्या असलेल्या समर्थकाला ते बिस्‍कीट देतात, असे या व्हिडिओमध्ये दिसते. यावरुन भाजपने राहुल गांधींवर हल्लाबोल केला. यावर आज ( दि. ६) राहुल गांधींनी भाजपला प्रत्‍युत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रेवेळी त्या कुत्र्याला माझ्याकडे आणण्यात आले, तेव्हा तो पूर्णपणे घाबरला होता. तो थरथरत होता. मी त्याला खायला बिस्किट दिले, त्याने खाल्‍ले नाही, म्हणून मी ते बिस्‍कीट त्‍याच्‍या मालकाकडे दिले. तसेच तुम्हीच खाऊ घाला असेही सांगितले. नंतर कुत्र्याने ते बिस्किट खाल्‍ले. संबंधित व्‍यक्‍ती हा काँग्रेसचा कार्यकर्ता नव्‍हता.कुत्र्याच्‍या मालकाकडे बिस्‍किट दिले यात भाजपचे काय गेले? या कुत्र्यामुळे भाजपचे काय नुकसान झाले, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

आसामचे मुख्‍यमंत्री सरमाने साधला होता राहुल गांधींवर निशाणा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी व्हायरल व्हिडिओवरून राहुल गांधीवर हल्‍लाबोल केला. हिमंता बिस्वा सरमा यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं होते की, , राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब आम्‍हाला “बिस्किट खायला” लावू शकत नाही. मला अभिमानास्पद आसामी आणि भारतीय आहे. मी काँग्रेसचा राजीनामा दिला,” असे ते म्हणाले.

अमित मालवीय यांनी व्हायरल व्हिडिओ पोस्ट करत X वरील पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती. आता राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि कुत्र्याने खाल्ली नाही तेव्हा त्यांनी तीच बिस्किटे आपल्या सर्मथकाला दिली. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे वागवत असतील, तर अशा पक्षाचा नाश होणे स्वाभाविक आहे.”

हेही वाचा :

 

 

Back to top button