Dada Bhuse : समर्थन नाही, पण इतका बाऊ करण्याची गरज नाही, दादा भुसेंची 'त्या' फोटोवर प्रतिक्रिया... | पुढारी

Dada Bhuse : समर्थन नाही, पण इतका बाऊ करण्याची गरज नाही, दादा भुसेंची 'त्या' फोटोवर प्रतिक्रिया...

नाशिक : गुंड निलेश घायवळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात प्रवेश करुन भेट घेतल्याच्या फोटो व व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर संजय राऊत यांनी तर महाराष्ट्रात गुंडाराज असल्याची टीकाही केली. गुंड निलेश घायवळ याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोविषयी पालकमंत्री दादा भुसे यांना विचारले असता त्यांंनी या प्रकाराचे समर्थन नाही पंरतु त्याचा इतका बाऊ करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दादा भुसे यांनी नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी सवांद साधला यावेळी ते बोलत होते. भुसे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय हे नेहमीच जनतेच्या गराड्यात असतात. त्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात हजारोंच्या संख्येने लोक येतात. यापूर्वी वर्षा बंगल्यावर ठराविक लोकांनाच प्रवेश होता. मात्र आता असे नाही, आता वर्षा बंगल्यावर अगदी साधा माणूस देखील जातो. त्यांच्या अडचणी समस्या ते मुख्यमंत्र्यांकडे मांडतात. त्यामुळे मंत्रालयात झालेल्या प्रकाराचे मी समर्थन करत नसलो तरी, त्याचा इतका बाऊ करणे चुकीचे असल्याचे दादा भुसे म्हणाले. गुंड प्रवृत्तीचे समर्थन कोणीच करणार नाही, त्यावर कठोर कारवाई करण्याचे धोरण सरकारचे असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले.

उमेदवारी कुणाला? हा अधिकार वरिष्ठांना

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत महायुतीमधील सर्वच पक्ष आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर आहेत. त्यावर विचारले असता, पालकमंत्री भुसे यांनी सध्या ती जागा शिवसेनेकडे आहे. लोकशाहीमध्ये मते व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना असतो. त्यामुळे सगळेच या जागेवर दावा दाखल करु शकतात. मात्र जागा कोणत्या पक्षाला द्यायची याबाबत महायुतीमधील वरिष्ठ नेते ठरवतील. त्याची अंमलबजावणी करण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले.

Back to top button