पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळ राज्य सरकार आणि राज्यपाल (Kerala Governor) आरिफ मोहम्मद खान यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफळला. राज्यपाल आज (दि.२७ ) कोट्टारकारा दौर्यावर असताना कोल्लममध्ये 'एसएफआय'च्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा एकदा काळे झेंडे दाखवले. यामुळे राज्यपाल भडकले. त्यांनी थेट रस्त्यावर धरणे आंदोलन करत सरकारवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या Z+ सुरक्षेत वाढ केली आहे. (Kerala Governor Security)
केरळ राज्य सरकार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि राजभवनापर्यंत सीआरपीएफचे Z+ सुरक्षा कवच वाढवण्यात आले आहे, अशी माहिती केरळ राजभवन जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Kerala Governor Security)
आज राज्यापल आरिफ मोहम्मद खान एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोट्टारकारा येथे जात होते. त्यांचा ताफा कोल्लममधील निलामेलमधून जात असताना 'सीपीआयएम'ची विद्यार्थी संघटना 'एसएफआय'च्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. या घटनेमुळे राज्यपाल इतके संतप्त झाले की, ते तात्काळ गाडीतून उतरले. रस्त्याच्या कडेला बसून त्यांनी धरणे आंदोलन केले. राज्यपालांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदाराकडून खुर्ची मागितली आणि ते तिथेच त्यांनी आपले धरणे आंदोलन सूरु केले. राज्यपालांचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये ते पोलिस अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. एसएफआय कार्यकर्त्यांना पोलिसांकडून संरक्षण दिले जात असून पोलिस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Kerala Governor Security)
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि सीपीआयएम सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद आहेत. राज्यातील विद्यापीठांच्या कामकाजाबाबत वाद सुरू असून, राज्यपाल अनेक विधेयकांवर स्वाक्षरी करत नाहीत, असा आरोप करत सीपीआयएमची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवले . गेल्या गुरुवारी, केरळ विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला, राज्यपालांनी अवघ्या काही मिनिटांत आपले अभिभाषण संपवले आणि अभिभाषणाचा शेवटचा परिच्छेद वाचून विधानसभेतून निघून गेले. यावरूनही सरकार आणि विरोधकांनी राज्यपालांवर टीका केली होती.