पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसेच अनेक काँग्रेस आमदार त्यांच्यासोबत जाणार आहेत, असे वृत्त इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. नितीशकुमार लालू यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीशी महायुती तोडून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये पुन्हा सामील होणार आहेत. (Bihar Political Crisis)
संबंधित बातम्या
नितीशकुमार रविवारी जेडीयू-भाजप युतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. तर भाजप नेते सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री होतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे. बिहारच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना भाजपचे दिग्गज नेते सुशील मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की "बंद दरवाजे पुन्हा उघडू शकतात" आणि राजकारणाला त्यांनी "शक्यतांचा खेळ" असे म्हटले होते. (Bihar Political Crisis)
नितीशकुमार यांचा जेडीयू आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) यांच्या सध्याच्या युतीमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये जेडीयू- भाजप एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
७२ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. २०१३ पासून त्यांचे 'एनडीए' ते 'यूपीए' ते महागठबंधन असे चारवेळा 'यू टर्न' झाले आहेत. आधी ते 'यूपीए'मध्ये होते. त्यानंतर त्यांनी 'एनडीए'ची कास धरली. त्यानंतर तेथून बाहेर पडत महागठबंधनमध्ये प्रवेश केला. आतासुद्धा इंडिया आघाडीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला; पण आता तेच पुन्हा 'एनडीए'त परत जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे देखील जागावाटपाच्या अयशस्वी चर्चेमुळे इंडिया आघाडीवर नाराज आहेत.