Stock Market Closing ‍‍Bell | तुफान विक्री! सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांना ८ लाख कोटींचा फटका

Stock Market Closing ‍‍Bell | तुफान विक्री! सेन्सेक्स १ हजार अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांना ८ लाख कोटींचा फटका

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातून कमकुवत संकेत, बँकिंग शेअर्समध्ये विक्रीचा मारा आणि नफावसुलीमुळे आज शेअर बाजार गडगडला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स तब्बल १ हजारहून अधिक अंकांनी घसरून ७०,३०० च्या खाली आला. तर निफ्टी ३०० अंकांनी घसरून घसरून २१,३०० वर आला. त्यानंतर सेन्सेक्स १,०५३ अंकांच्या घसरणीसह ७०,३७० वर बंद झाला. तर निफ्टी ३३३ अंकांच्या घसरणीसह २१,२३८ वर स्थिरावला. क्षेत्रीय आघाडीवर फार्मा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले. (Stock Market Closing ‍‍Bell)

सेन्सेक्स आज ७१,८६८ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने काहीवेळ ७२ हजारांवर व्यवहार केला. पण त्यानंतर तो ७०,२५० च्या खाली आला. आज दिवसाच्या उच्चांकावरून सेन्सेक्सचे सुमारे १,६०० अंकांनी नुकसान झाले.

सेन्सेक्स, निफ्टीची आजची घसरण प्रत्येकी सुमारे १.५० टक्क्यांची आहे. मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक सुमारे ३ टक्क्यांनी घसरल्याने व्यापक बाजारातील विक्री अधिक खोलवर गेली.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बाजारातील आजच्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे सर्व बीएसई (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३६६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले.

बँकिंगला मोठा फटका

HDFC बँकेच्या शेअर्समध्ये घसरण कायम आहे. यामुळे निफ्टी बँक २.४१ टक्क्यांनी घसरून ४४,९४९ वर आला. IDFC First Bank बँकेचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरून ८१.४५ रुपयांवर आले. त्यानंतर इंडसइंड बँक, पीएनबी, एयू स्मॉल फायनान्स बँक (AU) आणि एसबीआय (SBI) हेदेखील ४ ते ६ टक्क्यांदरम्यान घसरले.

एफएमसीजी आणि मेटलवरही दबाव

हाँगकाँगला मागे टाकून भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनल्यानंतर बाजारात मोठी घसरण दिसून आली. एफएमसीजी आणि मेटल शेअर्समध्येही दबाव राहिला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, एशियन पेंट्स, टाटा स्टील, ॲक्सिस बँक, रिलायन्स, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स हे सर्वाधिक घसरले. तर सन फार्मा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स तेजीत राहिले. (Stock Market Closing ‍‍Bell)

निफ्टीवर इंडसइंड बँक, कोल इंडिया, ओएनजीसी, अदानी पोर्ट्स, एसबीआय लाईफ हे शेअर्स टॉप लूजर्स होते. तर सिप्ला, सन फार्मा, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, हिरो मोटोकॉर्प वाढले.

Cipla चे शेअर्स वधारले

सिप्लाच्या तिमाही निकालांनी इतर फार्मा शेअर्सनीदेखील चालना मिळाली. निफ्टी फार्मा निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी वाढला. भारतातील अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या Cipla चे शेअर्स आज ७ टक्क्यांनी वाढून १,४१२ रुपयांच्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. तिसऱ्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा चांगल्या कमाईनंतर सिप्लाचे शेअर्स वधारले.

घसरणीमागील प्रमुख घटक

एचडीएफसी बँकेचा शेअर्समध्ये घसरण कायम

आज मुख्यतः एचडीएफसी बँक, रिलायन्स या हेवीवेट शेअर्समध्ये घसरण राहिली. एचडीएफसी बँकेचा शेअर्स आज पुन्हा ३ टक्क्यांनी घसरून १,४३१ रुपयांवर आला. डिसेंबर तिमाही निकालानंतर झालेल्या निराशेनंतर या शेअर्समध्ये सुरू असलेली घसरण कायम आहे. गेल्या आठवड्यात हा शेअर्स १५ टक्क्यांनी घसरला होता.

रिलायन्सही घसरला

आजच्या ट्रेडिंग सत्रात रिलायन्सचा शेअर्स २ टक्क्यांनी घसरून २,६४९ रुपयांवर आला. ऑईल आणि गॅस शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला. आयओसी, एचपीसीएल, अदानी टोटल गॅस, ऑइल इंडिया, ओएनजीसी आणि बीपीसीएल हे शेअर्स ४ ते ५ टक्क्यांनी घसरले.

परदेशी गुंतवणूकदारांकडून पुन्हा विक्री

गेल्या दोन महिन्यांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) खरेदीचा ओघ राहिला. पण या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news