Kuno National Park | कुनो नॅशनल पार्कमधून आली गुड न्यूज! ‘ज्वाला’ मादी चित्त्याने दिला ३ बछड्यांना जन्म

Kuno National Park | कुनो नॅशनल पार्कमधून आली गुड न्यूज! ‘ज्वाला’ मादी चित्त्याने दिला ३ बछड्यांना जन्म

पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून (Kuno National Park) एक आनंदाची बातमी आली आहे. येथील ज्वाला नावाच्या नामिबियन मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. नामिबियन मादी चित्ता आशाने बछड्यांना जन्म दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर आता ज्वाला नावाच्या मादी चित्त्यानेही बछड्यांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या 'एक्स' अकाउंटवर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील मादी चित्ता 'ज्वाला'ने तीन बछड्यांना जन्म दिल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज मंगळवारी दिली. "कुन्नोतील नवीन बछडे! ज्वाला नावाच्या नामिबियन मादी चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला आहे… देशभरातील सर्व वन्यजीव कर्मचारी आणि वन्यजीव प्रेमींचे अभिनंदन. भारतातील वन्यजीव समृद्ध होवोत…" असे भूपेंद्र यादव यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे.

'ज्वाला'चे आधीचे नाव 'सियाया' होते. तिने मार्च २०२३ मध्ये चार बछड्यांना जन्म दिला होता. पण त्यापैकी केवळ एक (मादी) बछडा जिवंत राहिला होता. चित्ता हा जगात जमिनीवरील सर्वात वेगवान धावणारा प्राणी आहे. पण १९५२ मध्ये भारतातून तो नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. भारतातील त्यांची लोकसंख्या पुनरुज्जीवित करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्ते स्थानांतरीत करण्यात आले होते.

चित्ता रिइंट्रोडक्शन प्रोजेक्ट अंतर्गत नामिबियातील ८ मोठे चित्ते (५ मादी आणि ३ नर) १७ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते उद्यानात आणण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ४ चित्यांना जंगलात सोडण्यात आले होते.

गेल्या वर्षी मे महिन्यात चित्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कारणे आणि उपाययोजनांचे स्पष्टीकरण देणारे तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. (Kuno National Park)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news