नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: कॅश फोर क्वेरी प्रकरणात संसदेतून निलंबित झालेल्या महुआ मोइत्रा यांनी अखेर सरकारी बंगला सोडला आहे. ८ डिसेंबर २०२३ ला त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर बंगला रिकामा करण्यासाठी महुआ मोइत्रा यांना ३ वेळा नोटीस देण्यात आली होती. (Mahua Moitra News)
बंगला सोडल्यानंतर महुआ मोइत्रांच्या वकिलांनी सांगितले की, त्यांनी बंगल्याच्या चाव्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, १६ जानेवारी रोजी महुआ मोइत्रांना बंगला त्वरित रिकामा करण्यास सांगितले होते. त्यापूर्वी त्यांना ७ जानेवारील बंगला रिकामा करण्यासंदर्भात सांगितले होते. तसेच १२ जानेवारीला दुसरी नोटीस या संदर्भात पाठवण्यात आली होती. (Mahua Moitra News)
महुआ मोइत्रांनी गुरुवारी (१८ जानेवारी) दिल्ली उच्च न्यायालयात त्यांना जारी करण्यात आलेल्या नोटिसीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे त्यांनी सांगितले होते. मात्र उच्च न्यायालयाने नोटीसीला स्थगिती देण्यास नकार दिला आणि महुआंची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने सांगितले की, महुआ मोइत्रांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सरकारी बंगल्यात राहण्याचा अधिकार नाही. (Mahua Moitra News)