नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभेतून निष्कासित करण्यात आलेल्या महुआ मोइत्रा यांना आता सरकारी घर सोडावे लागण्याची शक्यता आहे. संसदेच्या गृहनिर्माण समितीने तशी प्रक्रिया सुरु केली आहे. संसदेच्या गृहनिर्माण समितीने नगर विकास मंत्रालयाला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. महुआ मोइत्रा यांनी घर सोडण्याबाबतची प्रक्रिया सुरू करावी, असे या पत्रात लिहिण्यात आले आहे. Mahua Moitra
दरम्यान, कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी खासदीर म्हणून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. लोकसभेच्या नैतिक आचरण समितीच्या शिफारशींच्या आधारे महुआ मोईत्रांना अपात्र ठरविण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात लोकसभेत झाला होता. Mahua Moitra
महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती हिरानंदानींकडून पैसे आणि भेटवस्तू घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. या प्रकरणात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर नैतिक आचरण समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. नैतिक आचरण समितीला महुआ मोईत्रांवरील आरोप खरे आढळले होते. खासदार महुआ मोईत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि अशोभनीय होते, हा समितीचा निष्कर्ष आहे सभागृह मान्य करते, असे सभापती ओम बिर्ला म्हणाले होते.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनाही शासकीय निवासस्थान सोडावे लागले होते. मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. परिणामी त्यांना सरकारी घर गमवावे लागले होते. मात्र त्यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर घरही परत देण्यात आले होते.
हेही वाचा