Stock Market Closing Bell | IT मध्ये जबरदस्त खरेदी! सेन्सेक्स, निफ्टी रेकॉर्ड पातळीवर बंद, तेजीमागे होते ‘हे’ ५ घटक

Stock Market Closing Bell | IT मध्ये जबरदस्त खरेदी! सेन्सेक्स, निफ्टी रेकॉर्ड पातळीवर बंद, तेजीमागे होते ‘हे’ ५ घटक

पुढारी ऑनलाईन : आयटी शेअर्समधील जबरदस्त तेजीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने आज ऐतिहासिक कामगिरी केली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७५० हून अधिक अंकांनी वाढून ७३,४०२ चा उच्चांक नोंदवला. तर निफ्टीने पहिल्यांदाच २२ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर सेन्सेक्स ७५९ अंकांच्या वाढीसह ७३,३२७ वर बंद झाला. तर निफ्टी २०२ अंकांनी वाढून २२,०९७ वर स्थिरावला. आयटी क्षेत्रात झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टीच्या उच्चांकी तेजीला सपोर्ट मिळाला. तिमाहीतील कमाईच्या जोरावर एचसीएल टेक आणि विप्रो हे शेअर्स सर्वाधिक तेजीत राहिले. (Stock Market Closing Bell)

मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या चिन्हात बंद झाले. आयटी, PSU बँक, ऑईल आणि गॅस प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले.

द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.८ लाख कोटींनी वाढून ३७६.०९ लाख कोटी झाले. BSE वर सुमारे २,०९७ शेअर्स वाढले, १,८५१ घसरले आणि ११२ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

 संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ७३,०४९ अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर तो ७३,२८८ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर विप्रो, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, मारुती, रिलायन्स, टायटन हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स हे घसरले.

निफ्टीवर विप्रो, ओनजीसी, एचसीएल टेक, भारती एअरटेल आणि इन्फोसिस हे सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी लाईफ, बजाज फायनान्स, हिंदाल्को, बजाज फिनसर्व्ह, आयशर मोटर्स हे घसरले.

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC), रेल विकास निगम (RVNL), इरकॉन इंटरनॅशनल, ज्युपिटर वॅगन्स, टिटागड रेल सिस्टीम्स आणि टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग यासारखे रेल्वे शेअर्स आजच्या व्यवहारात १९ टक्क्यांपर्यंत वाढले. २०२४ च्या अर्थसंकल्पापूर्वी रेल्वे शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली आहे. (Stock Market Closing Bell)

IT शेअर्स तेजीत

निफ्टी आयटी आज सुमारे ३ टक्क्यांपर्यंत वाढला. यात विप्रो आणि एचसीएल टेकचे शेअर्स आघाडीवर राहिले. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील (Q3FY24) कमाईच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे आयटी शेअर्सनी आज रॉकेट भरारी घेतली. ही तेजी पुढेही वाढेल अशी बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डिसेंबर तिमाहीच्या कमाईच्या अंदाजांना मागे टाकल्यानंतर आज विप्रोचे शेअर्स जवळपास १४ टक्क्यांनी वाढला. हा शेअर्स आज ५२९ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. त्यानंतर हा शेअर्स ७ टक्के वाढीसह ४९८ वर आला. गेल्या वर्षभरात हा शेअर्स २५ टक्क्यांनी वाढला आहे. एचसीएल टेकचा शेअर्सही आज १,६१९ रुपयांपर्यंत गेला. हा शेअर्स वर्षभरात ४५ टक्क्यांनी वाढला आहे.

चीनमधील बाजारात घसरण; निवडणुकीनंतर तैवानमध्ये तेजीचे वारे

चीनच्या मध्यवर्ती बँकेने मध्यम-मुदतीच्या कर्जाच्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्य भूप्रदेश चीनच्या बाजारपेठेत सोमवारच्या सत्राच्या सुरूवातीला घसरण झाली होती. तर मतदारांनी सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सलग तिसर्‍यांदा अध्यक्षपदासाठी संधी दिल्यानंतर तैवानमधील शेअर्स वधारले. चीनमधील CSI 300 निर्देशांक ०.१ टक्के खाली येऊन बंद झाला. तर हाँगकाँगचा Hang Seng निर्देशांक ०.२६ टक्क्यांनी घसरला. सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या लाई चिंग-ते यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक मतांसह विजय मिळवल्यानंतर तैवान वेटेड निर्देशांक ०.१९ टक्के वाढून १७,५४६.८२ वर बंद झाला.

परदेशी गुंतवणूकारांकडून खरेदीचा जोर कायम

परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात खरेदीचा ओघ कायम आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ३,८६४ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले आहेत. तर, परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) ने गेल्या शुक्रवारी ३४० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २,९११ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

मध्यपूर्वेतील संघर्षाकडे लक्ष, कच्चे तेलाचे दर वाढले

येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील पुरवठा खंडित होण्याच्या जोखमीमुळे तेलाच्या किमती सोमवारी वाढल्या. येमेनच्या हुथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे लाल समुद्रात तणावाचे वातावरण आहे. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स शुक्रवारी १.१ टक्क्यांनी वाढल्यानंतर ते ०.३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७८.५३ डॉलर झाले. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ०.२ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७२.८५ डॉलरवर आले.

भारतीय रुपया वधारला

आज सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १२ पैशांनी वाढून प्रति डॉलर ८२.८२ वर पोहोचला होता. त्यानंतर भारतीय रुपया प्रति डॉलर 82.८८ वर बंद झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news