पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे मुख्यमंत्री (Jharkhand CM) हेमंत सोरेन यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीची टांगती तलवार आहे. या प्रकरणी त्यांना ईडीने सातवेळा समन्सही बजावले आहे. या प्रकरणी सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदाराने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता मुख्यमंत्री हेमंत सोरेन हेही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन राज्याच्या नव्या मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा झारखंडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर हेमंत सोरेन यांची बहिण अंजली सोरेन यांनी मोठे विधान केले आहे. ( Jharkhand CM Sister Said Kalpana Soren Could Be Next Chief Minister )
माध्यमांशी बोलताना अंजली सोरेन म्हणाल्या की, 'गरज पडल्यास हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होऊ शकतात. याबाबतचा निर्णय पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. मात्र आत्ता खात्री करू शकत नाही. हेमंत सोरेन यांना ईडीने बजावलेल्या समन्सवर अंजलीम्हणाल्या, 'एकीकडे आम्हाला मोठे केले जात आहे आणि दुसरीकडे आमचा छळ केला जात आहे. हेमंत सोरेन सरकार हे आदिवासी सरकार आहे. आम्ही आदिवासी असल्यामुळे आमचा छळ होत आहे. हेमंत सोरेन यांचे सरकार असेच काम करत राहिले तर आदिवासींची मते मिळणार नाहीत, अशी भीती सरकारला वाटते. त्यामुळेच तो हे सर्व करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ( Jharkhand CM Sister Said Kalpana Soren Could Be Next Chief Minister )
'ईडी'ने हेमंत सोरेन यांना सहावेळा चौकशीसाठी समन्स बजावले आहे; परंतु प्रत्येकवेळी हेमंत सोरेन कोणत्या ना कोणत्या कारणाने ईडीसमोर हजर राहिले नाहीत. आता ईडीने सातवे समन्स जारी केले असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ते कधी आणि कुठे भेटू शकतात हे सांगण्यास सांगितले आहे. याप्रकरणी ईडीही कायदेशीर कारवाईचा मार्ग शोधत असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, खुद्द मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी याबाबत खुलासा केलेला नाही.
हेही वाचा :