धुळे; पुढारी वृत्तसेवा : देश आणि राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे ते राज्याला काय निधी देणार. आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी त्यांना निधी मिळाला असेल. मुंबई महापालिकेच्या ९० हजार कोटी रुपयांची लूट करणाऱ्यांनी निधी आणण्याच्या गप्पा करू नये. राज्याच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी निधीची चर्चा करू नये. अन्यथा निधीतील घोटाळा उघडा करावा लागेल, असे आव्हान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले. Sanjay Raut Vs CM Shinde
धुळ्यात आज (दि.७) सलग दुसऱ्या दिवशी खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार आमशा पाडवी, माजी आमदार शरद पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. Sanjay Raut Vs CM Shinde
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार घाबरते आहे. मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, धुळे, जळगाव आदी १४ महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जात नाही. तुमच्याकडे शिवसेना आहे, चिन्ह आणि सर्व काही आहे. अशा परिस्थितीत हिम्मत असेल, तर निवडणुकांना सामोरे जा. आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
निवडणुका होण्याच्या तीन महिने आधी सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि पंतप्रधान यांच्या दौऱ्यावरील खर्चावर नियंत्रण आणले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांना बंदी केली पाहिजे. या कार्यक्रमांवर होणारा खर्च संबंधित पक्षावर टाकून, तो आचारसंहिते अंतर्गत लागू करून त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे.
पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी शपथ घेतल्यापासून स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार करीत आहेत. घोषणा, आश्वासन आणि प्रचार ही त्यांची त्रिसूत्री आहे, असा टोला त्यांनी लावला. भाजप नेत्यांनी राज्यात राजकीय भूकंप होईल, या विधानाचा देखील खासदार राऊत यांनी समाचार घेतला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रते संदर्भात दहा तारखेला निकाल देणार होते. पण त्यांची अचानक प्रकृती खराब झाली. हा देखील भूकंप असून ही भूकंपाची सुरुवात असल्याचा टोला त्यांनी लगावला.
देशात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अंतर्गत असलेल्या एजन्सीच्या माध्यमातून ओपिनियन पोल समोर आणले जातात. यानंतर भाजपचे दोन नेते निवडणुकीत विजयी होणारा आकडा जाहीर करतात. त्यानंतर संपूर्ण ईव्हीएम मशीन सेट केले जातात. काठावर असलेल्या उमेदवारांसंदर्भात ३० टक्के जागांवर मशीन सेट केले जातात. यात आता जागरूकता झाली पाहिजे. लोकांनी ईव्हीएमच्या विरोधात सत्याग्रहावर उतरले पाहिजे. सर्व राजकीय पक्षांनी हुकूमशाही विरोधात एकत्र आले पाहिजे. बांगलादेशात ईव्हीएम मशीन विरोधात सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.
भारतात देखील इंडिया आघाडीसह सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन असेल तर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार नाही. तुमच्या मशीनवर तुम्ही निवडणूक घ्या, अशी भूमिका घेऊन जगाला दाखवून द्यावी लागेल. ईव्हीएम संदर्भात देशात संशयाचे वातावरण आहे.
हेही वाचा