Delhi Liquor Policy scam | अरविंद केजरीवालांना आज अटक होणार? AAP नेत्यांनी व्यक्त केली भीती | पुढारी

Delhi Liquor Policy scam | अरविंद केजरीवालांना आज अटक होणार? AAP नेत्यांनी व्यक्त केली भीती

पुढारी ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना बुधवारी दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिसऱ्यांदा समन्स जारी केले होते. मात्र हे समन्स नक्की काय आहे? म्हणत त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. यामुळे केजरीवाल यांना अटक केली जाणार असल्याची भीती आप नेत्यांनी व्यक्त केली आहे. (Delhi Liquor Policy scam)

दरम्यान, आम आदमी पक्षाने (AAP) ने म्हटले आहे की त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी सकाळी ईडी त्यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर अटक होण्याची शक्यता आहे. कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने तिसरे समन्स केजरीवाल यांनी बजावले होते. पण तिसऱ्यावेळीही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. यामुळे केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा दावा आप नेते आतिशी, सौरभ भारद्वाज आणि जास्मिन शाह यांनी केला आहे.

“ईडी सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या अटकेची शक्यता आहे,” अशी आतिशी यांनी बुधवारी रात्री X वर पोस्ट केली होती.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आतिशी यांनी लोकसभा निवडणुका जवळ आल्याने केजरीवाल यांना समन्स जारी केले असल्याचे म्हणत ईडीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“ईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास केजरीवाल तयार आहेत. गेल्या दोन आठवड्यांत केजरीवाल यांना तीन समन्स बजावण्यात आले आहेत. ईडी लेखी प्रश्न देत ​​नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे. भारद्वाज आणि शाह यांनीही असेच ट्विट केले होते.

शाह यांनी X वर पोस्ट करत म्हटले, “BREAKING : सूत्रांनी पुष्टी केली की ईडी सकाळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापे टाकणार आहे. त्यांच्या अटकेची शक्यता आहे.”

केजरीवाल यांच्या अटकेची आणि त्यांच्या निवासस्थानावर ईडीच्या छाप्याची शक्यता असल्याने आप नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयात एकत्र होण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.

केजरीवाल यांना बुधवारी ईडीने मद्य घोटाळा संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. पण ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीला उत्तर पाठवले की आपण तपासात सहकार्य करण्यास तयार आहे. पण त्यांनी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते.

केजरीवाल यांना गेल्या वर्षी २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबर रोजी समन्स बजावण्यात आले होते. या दोन समन्सवर केजरीवाल यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता. आता तिसरे समन्स बजावण्यात आले आहे. तिसऱ्यावेळीही ते चौकशीसाठी हजर झाले आहेत. (Delhi Liquor Policy scam)

हे ही वाचा :

 

Back to top button