

अयोध्या: प्रसन्न जोशी : अयोध्येत सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकारत असलेल्या राम मंदिराचे लवकरच लोकार्पण होणार आहे. या महाप्रकल्पाच्या उभारणीत विविध आव्हाने आली; मात्र अभियांत्रिकी कौशल्य आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत अभियांत्रिकी कामासंबंधी सर्वाधिकार आम्हाला दिल्याने हे काम आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो, अशी माहिती मंदिर न्यासाकडून नियुक्त प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी दिली.
राम मंदिराच्या उभारणीत असंख्य लोकांचे योगदान आहे. यात महाराष्ट्रातील अभियंता जगदीश आफळे हे महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. आफळे यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू असून कामकाजासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, एल अँड टी, टीसीईसारख्या कंपन्या या कामात सहभागी झाल्या. वेळ, गुणवत्ता, मूल्य अशा इतर बाबींत त्यांनी उत्कृष्ट काम केले. याशिवाय विविध आयआयटीतील तज्ज्ञ सीबीआरआय, एनजीआरआय या संस्थांनी पायाभरणीच्या कामात मोलाची मदत केली, या सर्वांच्या ताकदीवर हे मंदिर उभे राहात आहे.
रात्रीच्या १५ अंश सेल्सिअस थंडीत काँक्रिटिंग करण्याचे काम अवघड होते, कडाक्याच्या थंडीत हे काम करताना आमचा कस लागला. दिवस-रात्र हे काम झाले. दुसरी गोष्ट म्हणजे या कामकाजात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही. दगडाच्या बांधकामाचा अनुभव एल अँड टी, टीसीई तसेच ट्रस्टलाही नव्हता, मात्र हा अनुभव आत्मसात करीत आम्ही इथपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.
मंदिरात एकूण ३९४ खांब असून प्रत्येकी एका खांबावर १२ ते १६ मूर्ती असतील, त्या साकारण्याचे काम किचकट असून कारागिरांना एका जागी बसून हे काम करावे लागते. एका मूर्तीसाठी तीन कारागिरांना १५ ते २० दिवस लागतात. हा कालावधी पाहता हे काम पूर्णत्वास जाण्यात आणखी काही वर्षे लागतील, असेही आफळे यांनी सांगितले.