Nitish Kumar : नितीशकुमार इंडिया आघाडीचे समन्वयक होणार? | पुढारी

Nitish Kumar : नितीशकुमार इंडिया आघाडीचे समन्वयक होणार?

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनियुक्तीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी नेमणूक होऊ शकते. इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या घडामोडींशी संबंधित उच्चपदस्थ सुत्रांनी नितीशकुमार यांच्या समन्वयकपदाच्या माहितीला दुजोरा दिला आहे. इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीमध्ये याबाबत औपचारिक घोषणा होईल, असेही कळते. Nitish Kumar

दिल्लीत १९ डिसेंबरला झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये समन्वयक पदासाठी नितीशकुमार यांचे नाव चर्चेत होते. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मांडला होता. याच बैठकीमध्ये, द्रमुकच्या नेत्यांनी नितीशकुमार यांच्या हिंदी भाषणाचा इंग्रजी अनुवाद मागितल्यावरून संतप्त झालेल्या नितीशकुमार यांनी हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे द्रमुकच्या नेत्यांना सुनावल्यामुळे देखील इंडिया आघाडीतील वातावरण तापले होते. Nitish Kumar

या बैठकीमध्ये समन्वयकपदाबाबतचा प्रस्ताव येऊ न शकल्याने नितीशकुमार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सुत्रांनी सांगितले की, नितीश कुमार यांची इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्ती केवळ औपचारिकता उरली आहे. आघाडीच्या पुढील बैठकीमध्ये याबाबत घोषणा होऊ शकते. संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदी पुन्हा नितीशकुमार यांची निवड होणे याकडे देखील त्याच दृष्टीने बघितले जावे, अशीही पुस्ती या सुत्रांनी जोडली. काँग्रेसपासून अंतर राखून असलेल्या ओडिशातील बिजू जनता दल, तेलंगाणातील भारत राष्ट्र समिती यासारख्या पक्षांशी नितीशकुमार यांचे असलेले सख्य पाहता त्यांच्या समन्वयक पदाचा लाभ इंडिया आघाडीला होऊ शकतो, असा युक्तिवाद केला जात आहे.

संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल दिल्लीत झाली होती. यामध्ये राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा दिला. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीशकुमार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा 

Back to top button