द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांचे वादग्रस्त वक्तव्य, इंडिया आघाडीतील वातावरण पुन्हा तापले?

द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांचे वादग्रस्त वक्तव्य, इंडिया आघाडीतील वातावरण पुन्हा तापले?
Published on
Updated on

नवी दिल्ली; प्रशांत वाघाये : द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर प्रदेशातील आणि बिहारच्या लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडीओ समोर आला. यावरून पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये वातावरण तापले आहे. इंडिया आघाडीतील काही पक्षांनी विशेषतः उत्तर भारतातील पक्षांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिहार काँग्रेसच्या वतीने दयानिधी मारन यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तर, तेजस्वी यादवही या वक्तव्यावर चांगलेच भडकले आहेत. भाजपनेही यावरुन इंडिया आघाडीला लक्ष्य केले आहे. मात्र, हा व्हिडीओ जुना असल्याचा दावा द्रमुककडून करण्यात आला आहे. यानिमीत्ताने पुन्हा एकदा उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असे चित्र निर्माण झाले आहे.

यापूर्वी संसदेत द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार यांनी हिंदी पट्ट्यातील राज्यांबद्दल बोलताना 'गोमूत्र राज्ये' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते, तेव्हा काँग्रेसला त्यांना समज द्यावी लागली होती. पुढे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या मालिकेत द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांचे उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांबद्दलचे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर समोर आले आहे. त्यामुळे भाजपकडून या वक्तव्याचे भांडवल होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्याचे प्रयत्न इंडिया आघाडी करत आहे.

द्रमुक हा इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. द्रमुकच्या खासदाराचे हे वक्तव्य उत्तर भारतात इंडिया आघाडीला जड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे उत्तर भारतातील नेते नाराज झाले आहेत. आधीच जागावाटप आणि यापूर्वी काही नेत्यांनी केलेल्या विविध वक्तव्यामुळे इंडिया आघाडीत वातावरण तापले असताना दयानिधी मारन यांच्या या नव्या वक्तव्याने त्यात भर घातली आहे. इंडिया आघाडीत सुरुवातीपासून नितीश कुमार यांना संयोजक करण्यात यावे, यासाठी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ताकद लावली. मात्र अद्याप तरी तसे होऊ शकले नाही. त्यामुळे नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर त्यांनी सांगितले की आपण नाराज नाही आहोत. मात्र त्यांची नाराजीवजा शांतता लपून राहिली नाही.

आता पर्यंत इंडिया आघाडीच्या चार बैठक पार पडल्या. मात्र इंडिया आघाडीने संयोजक जाहिर केले नाही. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी आघाडीला संयोजक असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जागावाटपात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये राजद आणि जदयु तर दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष काँग्रेसला फार जागा देण्यात उत्सुक नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने जवळ जवळ सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले होते. समाजवादी पक्षानेही यात उमेदवार उभे केले होते. काँग्रेस नेते कमलनाथ आणि अखिलेश यादव यांच्यात शाब्दीक हल्लेही झाले. काँग्रेस इंडिया आघाडीत सर्वात मोठा पक्ष असला तरी इतर पक्ष काँग्रेसवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. पाच राज्यांच्या निकालानंतर तर काँग्रेसवर बाण उडवायची आणि सल्ले देण्याची संधी घटक पक्षांनी सोडली नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सोडवत नसताना इंडिया आघाडीतील समस्या मात्र वाढत आहेत.

त्या व्हिडिओत काय?

उत्तर प्रदेश, बिहारची लोक इथे तामिळनाडूमध्ये येतात. शौचालये स्वच्छ करणे, बांधकाम क्षेत्रात काम करणे, नाले साफ करणे यासारखी क्षुल्लक कामे ते करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news