Elon Musk : एआयमुळे भविष्यात नोकऱ्याच संपणार; ‘टेस्ला’ चे संस्थापक अॅलन मस्क यांनी व्यक्त केली भीती | पुढारी

Elon Musk : एआयमुळे भविष्यात नोकऱ्याच संपणार; 'टेस्ला' चे संस्थापक अॅलन मस्क यांनी व्यक्त केली भीती

लंडन; वृत्तसंस्था : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे नोकऱ्यांच्या बाबतीत येणारा काळ कठीण असणार आहे; कारण एआय ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक शक्ती असून, यामुळे बहुतेक सर्व नोकऱ्या बंद होणार आहेत. एकवेळ अशी येईल की, नोकरी देण्याची गरजच राहणार नाही, सारी कामे एआय करेल, असा इशारा ‘टेस्ला’चे संस्थापक अॅलन मस्क यांनी दिला आहे.

ब्रिटनमध्ये झालेल्या पहिल्या एआय सुरक्षा परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मस्क यांनी एआय आणि भविष्यकाळातील आव्हाने यावर अनेक खळबळजनक विधाने केली. ते म्हणाले की, एआयमुळे येणारा काळ चांगला नाही. बहुतेक सर्व प्रकारच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. एकवेळ अशी येईल की, कुणाला नोकरीवर ठेवण्याची गरजच भासणार नाही; कारण सारी कामे एआयच करेल. एआय ही इतिहासातील सर्वात विध्वंसक शक्ती आहे. भविष्यात नोकऱ्याच नसतील. सारे एआय करेल. तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत समाधानासाठी नोकरी शोधावी लागेल. भविष्यात आयुष्याचा अर्थ शोधण्याचेच मोठे आव्हान राहणार आहे.
मस्क म्हणाले की, एआयच्या बाबतीत सुरक्षेची चिंता सर्वात मोठी आहे. ह्यूमनॉईड रोबोच्या बाबतीत तर ती अधिकच आहे. कार किमान तुमचा इमारतीत किंवा झाडावर पाठलाग तरी करणार नाही; पण ह्यूमनॉईड सारे काही करतील. हे तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्यामुळे सरकारांनी आताच त्याबाबत कायदे करण्याची घाई करू नये. ज्या कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करीत आहेत त्यांनाच यातील खाचखळगे माहिती आहेत, आपले निष्कर्ष त्यांनी सरकारांकडे द्यायला हवेत. त्यानंतर याबाबत कायदे करायला हवेत.

Back to top button