पंतप्रधान मोदी आज अयोध्येत; विमानतळासह विविध योजनांचे करणार उद्घाटन | पुढारी

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत; विमानतळासह विविध योजनांचे करणार उद्घाटन

अयोध्या : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्येच्या एका दिवसाच्या दौर्‍यावर येत असून त्यात अयोध्येतील 15 हजार 700 कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

अयोध्येत 22 जानेवारीच्या रामल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे असणारच आहेत. पण त्या आधी शनिवारी ते अयोध्यावासीयांना विविध विकासकामांच्या उद्घाटनांची भेट देणार आहेत. त्यात नवीन विमानतळ, अयोध्याधाम रेल्वे स्थानक, वंदे भारत आणि अमृत भारत या नवीन रेल्वेंचे उद्घाटन आदी कामांचा समावेश आहे. सकाळी सव्वाअकरापासून विविध कामांचे लोकार्पण होणार असून त्यात अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन, सहा नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचे उद्घाटन, दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.

दुपारी सव्वाबारा वाजता त्यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन होईल. भारतीय मंदिर वास्तुकलेसारखी रचना असलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनल भवनचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. यानंतर याच विमानतळावर अहमदाबाद ते अयोध्या आण दिल्ली ते अयोध्या या इंडिगोच्या विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. याशिवाय अयोध्या व परिसराच्या विकासाच्या अनेक योजनांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

विमानतळाच्या संकुलात रामायणातील चित्रे

या विमानतळाचे नाव पहिल्यांदा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ असे ठरले होते. मात्र नुकतेच ते बदलून महर्षी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले आहे. येत्या सहा जानेवारीपासून येथून नियमित उड्डाणे सुरू होणार आहेत. इंडिगो एअरलाईन्सने अयोध्येतून दिल्ली-अहमदाबाद आणि मुंबईसाठी थेट विमान फेर्‍यांची घोषणा केली आहे. या विमानतळाच्या संकुलात रामायणातील पात्रे, प्रसंग यावर आधारित चित्र आणि शिल्पे उभारण्यात आली आहेत.

Back to top button