Bharat Nyay Yatra : अशी असेल राहुल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’; जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Bharat Nyay Yatra : अशी असेल राहुल गांधी यांची 'भारत न्याय यात्रा'; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या टप्प्याचे नाव भारत न्याय यात्रा असेल. वांशिक हिंसाचाराने होरपळलेल्या मणिपूरमधून यात्रेला प्रारंभ होईल. तर २० मार्चला मुंबईमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. अर्थात, ही यात्रा पायी आणि वाहनाने प्रवास करून पूर्ण केली जाणार आहे. (Bharat Nyay Yatra)

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे इम्फाळमध्ये १४ जानेवारीला यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. ६२०० किलोमीटरची ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा चौदा राज्यांमधून जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज कॉंग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  (Bharat Nyay Yatra)

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा कन्याकुमारी ते काश्मीर (दक्षिण भारत ते उत्तर भारत) असा होता. भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा ४५०० किलोमीटरचा होता. ही यात्रा १२ राज्यांमधून गेली होती. आता भारत न्याय यात्रा पूर्व भारत ते पश्चिम भारत असेल आणि ‘भारत न्याय यात्रा’ देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी असेल, असा दावा कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे.

संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, की मागील आठवड्यात २१ डिसेंबरला झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींना पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा सुरू करण्याचा आग्रह धरण्यात आला होता. तसेच राहुल गांधींनी पूर्वेकडून पश्चिमेकडे यात्रा सुरू करावी, असेही कार्यकारिणीचे म्हणणे होतो. राहुल गांधींनी याला होकार दिल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने १४ जानेवारी ते २० मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले.

तर, जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही हे तीन मुद्दे उपस्थित केले होते. आता भारत न्याय यात्रा ही आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्यायासाठी असेल. ही यात्रा पायी आणि बस प्रवास अशा दोन्ही स्वरुपाची असेल, असेही जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

Bharat Nyay Yatra  : नागपूरमध्ये गुरूवारी स्थापनादिन

कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या (२८ डिसेंबर) नागपूरमध्ये “है तय्यार हम” महा सभा होणार आहे. या महासभेच्या निमित्ताने कॉंग्रेस पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकणार असल्याचेही जयराम रमेश यांनी यावेळी सांगितले. या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य आणि देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत.

अशी असेल यात्रा

१४ जानेवारी ते २० मार्च

इम्फाळ (मणिपूर) ते मुंबई (महाराष्ट्र)

६२०० किलोमीटरची यात्रा

मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा चौदा राज्यांमधून प्रवास

 

हेही वाचा 

Back to top button