Blast near Israel embassy | दिल्लीत इस्रायल दूतावासाजवळ स्फोट, २ संशयित सीसीटीव्हीत कैद, पत्रातून ‘बदला’ घेण्याची धमकी | पुढारी

Blast near Israel embassy | दिल्लीत इस्रायल दूतावासाजवळ स्फोट, २ संशयित सीसीटीव्हीत कैद, पत्रातून 'बदला' घेण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन : नवी दिल्लीतील इस्रायल दूतावासाजवळ मंगळवारी स्फोट झाला होता. त्यानंतर या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. इस्रायलच्या दूतावासाने या घटनेला दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. (Blast near Israel embassy)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यात स्फोटाच्या ठिकाणी दोन संशयित दिसून आले आहेत. त्यांचा मागोवा घेऊन त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संशयितांची अधिक माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलीस जवळपासच्या कॅमेऱ्यांतील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहेत.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, इस्रायल दूतावासाच्या राजदूताला उद्देशून इस्त्रायली ध्वजात गुंडाळलेले एक पत्र स्फोटाच्या ठिकाणी सापडले आहे. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या या पत्रात गाझामध्ये इस्रायलची कृती आणि बदला घेणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले की, “Sir Allah Resistance” म्हणून ओळखल्या जाणार्‍या गटाने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

स्फोटाच्या घटनेनंतर या परिसराची काही काळासाठी नाकाबंदी करण्यात आली होती आणि नंतर पुन्हा हा परिसर खुला करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी या स्फोटाचा तपास सुरू केला आहे.

‘एनआयए’चे पथक घटनास्थळी

मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राजधानी दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासानजीक जोरदार स्फोट झाला. यात कुणीही जखमी झाले नसले तरी हाय सेक्युरिटी भागात हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे. घटनास्थळी इस्रायली राजदूतांच्या नावे पत्र सापडल्याचे सूत्रांनी सांगितल्याने या प्रकाराचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पोलस कंट्रोल रुमला इस्रायलच्या दूतावासानजीक स्फोट झाल्याचा फोन आला. चाणक्यपुरी या अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या भागात ही घटना घडल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एनआयए व फोरेन्सिक विभागाची पथके तेथे दाखल झाली. या सोबतच इस्रायली दूतावासातील सुरक्षा पथकही तपासकामाला लागले.

ज्या भागात स्फोट झाल्याचे सांगण्यात आले, तो भाग सुरक्षा यंत्रणांनी सील केला असून, तेथे इस्रायलच्या राजदूतांच्या नावे एक पत्र सापडल्याचे सांगण्यात आले. इस्रायली परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची दखल घेतली असून, दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. दूतावासातील उपायुक्त ओहाद नकाश कायनार यांनी भारतीय आणि इस्रायली सुरक्षा पथके तपासला लागल्याचे म्हटले आहे. (Blast near Israel embassy)

दूतावासाने दिला दुजोरा

इस्रायली दूतावासाच्या प्रवक्त्याने दूतावासाजवळ जोरदार स्फोट झाल्याचा आवाज आल्याचे सांगत या घटनेला दुजोरा दिला. या कामी दिल्ली पोलिस आणि इस्रायलचे सुरक्षा पथक तपास करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

 

Back to top button