काही दिवसांपूर्वी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून काही अभिनेते, अभिनेत्री यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले होते. यानंतर या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात देशभरात आवाज उठवण्यात आला होता. केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. दरम्यान, केंद्र सरकारने आणखी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार कोणत्याही वापरकर्त्याने या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याबाबत तपास यंत्रणांना किंवा पोलीस यंत्रणांना स्वतःहून माहिती देण्याची जबाबदारी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची असणार आहे. तसेच कायद्याने प्रतिबंधित मजकूर आणि मजकुराच्या प्रकारांची माहिती सर्वसामान्य वापर कर्त्यांना सोशल मिडिया प्लॅटफॉर्मने स्थानिक भाषेत द्यायची आहे. कुठल्याही वापरकर्त्यांकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहण्याची जबाबदारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची असणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सूचना जारी केल्या आहेत.