पुढारी ऑनलाईन : दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर गुरुवारी हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराचे ५ जवान शहीद झाले असून २ जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यान धत्यार वळणावर येथे दुपारी ३:४५ च्या सुमारास हा हल्ला झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Jammu and Kashmir)
जम्मूमधील संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुनील बर्तवाल यांनी सांगितले की, दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुंछ जिल्ह्यातील ढेरा की गली भागात संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या दरम्यान तेथे चकमक सुरू झाली. सुरक्षा जवान घटनास्थळाच्या दिशेने जात असताना दहशतवाद्यांनी दोन वाहनांवर (एक ट्रक आणि एक जिप्सी) गोळीबार केला. ज्यात ५ जवान शहीद झाले आणि २ जण जखमी झाले.
ज्या ठिकाणी लष्कराच्या दोन वाहनांवर एक ट्रक आणि एक मारुती जिप्सी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता त्या ठिकाणाची दहशतवाद्यांनी रेकी केली असावी, असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्यापैकी तीन किंवा चारजणांचा या हल्ल्यात सहभाग असल्याची माहिती पुढे आली आहे.
धत्यार वळणाच्या ठिकाणी लष्कराच्या गाड्यांचा वेग कमी झाल्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला सुरक्षा दलांच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. पण दहशतवादी त्या ठिकाणाहून पळून गेले, असे सूत्रांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ची शाखा पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला डेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या भागात घनदाट जंगल आहे. यावर्षी २० एप्रिल रोजी या भागात लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. (Jammu and Kashmir)
यावर्षी राजौरी, पुंछ आणि रियासी जिल्ह्यात अनेक चकमकी झाल्या. ज्यात १९ सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. तसेच २८ दहशतवाद्यांसह ५४ लोक मारले गेले आहेत. राजौरीमध्ये १४ सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. येथे १० दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. तर पूंछमध्ये ५ सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. तर १५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर रियासीमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
हे ही वाचा :