तेल अवीव, वृत्तसंस्था : हमासशी सुरू असलेल्या जमिनीवरील युद्धात इस्रायलच्या लष्कराला मोठे यश आले आहे. गाझामधील हमासचा सर्वात मोठा बोगदा लष्कराला सापडला आहे. याच बोगद्यात हमासचे प्रमुख नेते लपून बसत असत. (Isreal Hamas War)
बोगद्याचा ताबा लष्कराने घेतला असून, आजअखेर 8 कि.मी. रस्ता मोकळा केला आहे. इस्रायली लष्कराने बोगदा दाखविण्यासाठी पत्रकारांनाही पाचारण केले होते. या बोगद्याबाबतचे वृत्त जगभरातील वृत्तपत्रांनी प्रसिद्धही केले आहे. विशेष म्हणजे या बोगद्याचे एक तोंड इस्रायलच्या सीमेच्या अगदी जवळ आहे. बोगदा अनेक ठिकाणी जमिनीच्या खाली 165 फुटांपर्यंत खोल आहे. बोगद्यात निवारागृहे आहेत आणि त्यात अनेक चैनीच्या वस्तूंसह सॅटेलाईट फोनही सापडले आहेत. (Isreal Hamas War)
युद्धबंदीसाठी इटलीचा दबाव
दुसरीकडे अमेरिका आणि जर्मनीपाठोपाठ इटलीनेही इस्रायलवर युद्धबंदीसाठी दबाव वाढवला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन या आठवड्यात इस्रायलच्या राजधानीत दाखल होतील. हमासचे दहशतवादी इस्रायलच्या उत्तरेकडील भागात हल्ले करून अचानक गायब होत असत. या बोगद्याची मोठी भूमिका यात होती. हा बोगदा हमास नेता याह्या सिनवारचा भाऊ मोहम्मद सिनवार याने तयार केला होता. मोहम्मद खान हा युनिस भागातील हमासचा बटालियन कमांडर आहे, असे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले.