पुढारी ऑनसाईन डेस्क : ओमानचे सुलतान आणि पंतप्रधान हैथम बिन तारिक हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ते पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, त्यांचा हा दौरा म्हणजे दोन्ही देशातील धोरणात्मक भागीदारीला चालना देणारी मानली जाते. आज (दि.१६) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम तारिक यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस भेट झाली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधावर चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. (India-Oman Partnership)
ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल (दि.१६) त्यांचे दिल्ली येथील विमानतळावर स्वागत करण्यात आले. दरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे राष्ट्रपती भवनात त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे चर्चा झाली. यामुळे दोन्ही देशातील द्वीपक्षीय संबंधांना आणखी मजबूती मिळणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट परराष्ट्र मंत्रायलयाचे अधिकृत प्रवक्ते अरविंदम बागची यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून केली आहे. (India-Oman Partnership)
अरबी समुद्रातील भारत- ओमेन हे दोन्ही देश भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहेत. या दोन्ही देशात सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. याचे श्रेय दोन्ही देशात असलेल्या ऐतिहासिक सागरी व्यापार संबंधांना दिले जाते. भारत आणि ओमान यांच्यातील संबंध ५००० वर्षांपूर्वीपासून आहे. दोन्ही देशातील राजनैतिक संबंध १९५५ मध्ये स्थापित झाले आहेत. त्यानंतर २००८ मध्ये हे संबंध धोरणात्मक भागीदारीमध्ये सुधारित केले गेले. ओमान हा भारताच्या पश्चिम आशिया धोरणाचा प्रमुख आधारस्तंभ आहे.
भारत आणि ओमानमध्ये उच्च पातळीवरील राजनैतिक देवाणघेवाण वारंवार होत असते. दोन्ही देशातील मंत्रीस्तरीय भेटी नियमितपणे आयोजित केल्या जातात. ओमानची सल्तनत आखाती देशांमध्ये भारताची धोरणात्मक भागीदार आहे. ही गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC), अरब लीग तथा इंडियन ओशन रिम असोसिएशन साठी (IORA) महत्त्वाची संवादक आहे.
संयुक्त लष्करी सहकार्य समितीच्या बैठकीत दोन्ही देशांचे संरक्षण मंत्रालय दरवर्षी त्यांच्या संबंधांचा आढावा घेतात. तसेच भारत आणि ओमान त्यांच्या तीन लष्करी सेवांमध्ये नियमित द्विवार्षिक द्विपक्षीय सराव आयोजित करतात. दोन्ही देशात लष्करी सराव : अल नजाह, हवाई दल सराव : ईस्टर्न ब्रिज आणि नौदल सराव : नसीम अल बहर आयोजित करण्यात येतात. ओमान २००८ पासून भारतीय नौदलाच्या चाचेगिरी विरोधी मोहिमांना पाठिंबा देत आहेत. तसेच परदेशात तैनातीसाठी भारतीय नौदलाच्या जहाजांचे ओमानकडून नियमितपणे स्वागत केले जाते.
ओमानसोबतचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वाढवण्यास भारताचे नेहमीच प्राधान्य दिले आहे. जॉइंट कमिशन मीटिंग (JCM) आणि जॉइंट बिझनेस कौन्सिल (JBC) यांसारख्या संस्थात्मक यंत्रणा भारत आणि ओमानमधील आर्थिक सहकार्य मजबूत करतात. भारत आणि ओमानमध्ये मजबूत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध आहेत. भारत हा ओमानच्या प्रमुख व्यापारी भागीदारांपैकी एक देश आहे. भारत हा ओमानसाठी युएई आणि चीन नंतर तिसरा सर्वात मोठा आयातीचा स्त्रोत होता.
भारत ओमानला खनिज इंधन, खनिज तेल आणि त्यांच्या ऊर्ध्वपातनाची उत्पादने, बॉयलर, यंत्रसामग्री आणि यांत्रिक उपकरणे, लोखंड किंवा पोलाद, इलेक्ट्रिकल मशिनरी आणि उपकरणे, कापड आणि वस्त्रे, रसायने, चहा, कॉफी, मसाले इ. वस्तू निर्यात करतो. तर ओमानमधून भारतात आयात होणाऱ्या मुख्य वस्तूंमध्ये खते, खनिज इंधन, खनिज तेल आणि त्यांच्या ऊर्ध्वपातनातील उत्पादने, बिटुमिनस पदार्थ इत्यादींचा समावेश होतो.
भारतीय वित्तीय संस्था स्टेट बँक ऑफ इंडिया, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम एअर इंडिया, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) इत्यादींच्या शाखा ओमानमध्ये आहेत. तर भारतीय लोह आणि पोलाद, सिमेंट, खते, कापड इत्यादी क्षेत्रात कंपन्यांनी ओमानमध्ये गुंतवणूक केली आहे.
भारत आणि ओमानमध्ये घनिष्ठ सांस्कृतिक संबंध आहेत. ओमानमधील भारतीय प्रवासी समुदाय नियमितपणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत. तसेच यामध्ये भारतातील प्रसिद्ध कलाकार आणि गायकांना देखील आमंत्रित केले जाते.
ओमानमध्ये जवळपास सर्व व्यावसायिक क्षेत्रात गुंतलेला मोठा भारतीय समुदाय आहे. हजारो भारतीय डॉक्टर्स, इंजिनिअर्स इत्यादी ओमानमध्ये काम करत आहेत. ओमानमधील अंदाजे ४५ हजार भारतीय मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी CBSE अभ्यासक्रमाच्या अनेक भारतीय शाळा आहेत.