एसटी खासगीकरणाच्या मार्गावर, लांब पल्ल्यांच्या मार्गांवर खासगी गाड्या सोडणार | पुढारी

एसटी खासगीकरणाच्या मार्गावर, लांब पल्ल्यांच्या मार्गांवर खासगी गाड्या सोडणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एसटीचा लांबत चाललेला संप मोडून काढण्यासाठी खासगीकरणाचे आक्रमक पाऊल राज्य परिवहन महामंडळाने उचलले असून, ग्रामीण भागात आणि लांब पल्ल्यांच्या मार्गांवर खासगी गाड्या सोडणे आणि प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांची भरती करणे, असे दोन निर्णय महामंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत घेतले.

एसटीत गुरुवारी 7 हजार 541 कर्मचारी कामावर रुजू झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत 93 एसटीमधून 2 हजार 457 प्रवाशांनी प्रवास केला. असे असले तरी एसटी संपाचा मोठा तडाखा संपूर्ण महाराष्ट्राला बसत आहे. आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले एसटी कर्मचारी कामावर येण्याची चिन्हे नाहीत. विलीनीकरणाच्या मागणीवर ते ठाम असल्याने संप कधी मिटेल याची कोणतीही हमी नसल्याने महामंडळाने खासगीकरणाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गुरुवारी सायंकाळी झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत पोलीस खात्याने दिलेल्या गोपनीय अहवालावर चर्चा झाली. या अहवालानुसार एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा राज्याच्या ग्रामीण भागावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. त्यामुळे एसटीच्या ग्रामीण भागातील मार्गावर खासगी गाड्या चालवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकार्‍याने सांगितले.

ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक पुन्हा सुरु करण्यासाठी खासगी गाड्या कशा पद्धतीने सोडता येतील याचा अभ्यास आणि सर्व्हे करण्यासाठी एका खासगी संस्थेची निवड महामंडळाने केली आहे. या संस्थेच्या अहवालानंतर ग्रामीण भागातील फेर्‍यांचे खासगीकरण होईल. तसेच लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी खासगी वाहतूकदारांकडून किलोमीटरवर भाडेतत्त्वावरील गाड्या घेण्याचा निर्णयदेखील महामंडळाने घेतला आहे. येत्या आठवड्यात त्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.

नोकरभरतीचा इशारा

संप मोडून काढण्यासाठी आधी निलंबन, बडतर्फी, प्रतीक्षा यादीवरील कर्मचार्‍यांना कामावर घेणे आणि भाडेतत्त्वावरील बस घेऊन राज्यातील प्रवासी वाहतूक सुरू करणे ही चतुसूत्री अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निलंबन आणि बडतर्फीची कारवाई झाल्यानंतर आता प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्यात येणार आहे.

कर्मचारी कामावर आले तर ठीक, अन्यथा प्रतीक्षा यादीवरील कर्मचार्‍यांना कामावर घेऊ, असा इशारा परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी शुक्रवारी दिला. महामंडळाने धुळे, जळगावमध्ये प्रतिक्षा यादीवरील कर्मचारी घेण्यास सुरुवातदेखील केली आहे. हे सर्व कर्मचारी हंगामी स्वरुपात घेण्यात येतील. कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या 2586 कर्मचार्‍यांना शुक्रवारपासून बडतर्फ करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशचा फॉर्म्युला?

उत्तर प्रदेश एसटी महामंडळात 11 हजार 393 पैकी 9 हजार 233 बसेस रोज धावतात. यातील 30% बसेस खासगी आहेत. कर्मचारी संख्या 21 हजार असून, प्रतिबसवर 3 कर्मचारी आहेत. उत्तर प्रदेशचा हा एसटी पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याचाही विचार आता सुरू आहे.

प्रतीक्षा यादी कधीची?

एसटी महामंडळाने कोरोनामुळे आर्थिक तोटा वाढल्याने अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्यासाठी 2016-17 व 2019 अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित केली होती. कोरोना निर्बंधात सूट मिळाल्यानंतर ही स्थगिती फेब्रुवारी 2021 मध्ये उठवली. परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागू झाल्याने चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया पुन्हा रखडली.

2600 हून अधिक उमेदवार असून यात काहींचे प्रशिक्षण पूर्ण होऊन अंतिम चाचणी होणे बाकी आहे, तर काही उमेदवार अंतिम चाचणीही होऊन सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलढाणा, धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, नागपूर, भंडारा, ठाणे या विभागातील सर्वाधिक चालक कम वाहक पदाचे उमेदवार आहेत.

* संप न मिटल्यास एसटी सेवांचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
* पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्यांच्या मार्गांवर खासगी गाड्या उतरतील. ग्रामीण भागातील फेर्‍याही खासगी चालकांकडे दिल्या जातील.
* शिवशाही आणि शिवनेरी या खासगी गाड्यांच्या मालकांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
* लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी वाहतूकदार आपल्या गाड्या महामंडळाच्या आगारांमध्ये लावतील आणि प्रवासी वाहतूक करतील.
* लांब पल्ल्याच्या प्रवासाचे तिकीट दर मात्र महामंडळाप्रमाणेच आकारण्यात येणार आहेत.
* ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अंतरांच्या फेर्‍यांचे खासगीकरण सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर केले जाईल. या फेर्‍यांसाठीही खासगी गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत.

Back to top button