Parliament security breach: संसद सुरक्षा भंग प्रकरणातील मास्टरमाइंड ‘ललित झा’ ला ७ दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

Parliament security breach: संसद सुरक्षा भंग प्रकरणातील मास्टरमाइंड 'ललित झा' ला ७ दिवसांची पोलीस कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: बुधवारी (दि.१३) संसदेचे लोकसभा सभागृहात कामकाज सुरू असतानाच दोन तरूणांनी घुसखोरी केली. तर काही तरूणांनी संसद परिसरात धुराच्या नळकांड्या फोटडल्या.तर काहींनी निदर्शने करत घोषणाबाजी केली. या प्रकरणातील मास्टरमाइंड ललित झा स्वतःहून पोलिसांना शरण आला. दरम्यान ललित झा याला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात  हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने ललित झा याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (Parliament security breach)

संसदेतील सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांवर दहशतवादविरोधी कायदा (यूएपीए) व्यतिरिक्त भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संसदेत पोहोचण्यापूर्वी गुरुग्राममध्ये विशाल शर्मा ऊर्फ विकी याच्या घरी थांबले होते. सागर शर्मा, मनोरंजन डी., अमोल शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेनंतर फरार झालेला ललित झा याने स्वतःहून दिल्लीतील कर्तव्य पथ पोलीस स्थानकात गुरुवारी आत्मसमर्पण केले. यानंतर आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने ‘झा’ याला पोलीस कोठडी सुनावली. (Parliament security breach)

इतर चार आरोपींनाही ७ दिवस पोलीस कोठडी

संसद सुरक्षा भंग प्रकरणातील सागर शर्मा, डी मनोरंजन, नीलम सिंह, अमोल शिंदे या चारही आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गुरुवारी (दि. 14) संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पटियाला हाऊस कोर्टात सादर केले. पोलीस आणि आरोपी अशा दोन्ही बाजु कोर्टाने ऐकून घेतल्या. आरोपींनी दिलेल्या प्रश्नांची उत्तरेही ऐकली. पोलिसांनी 15 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी पटियाला हाऊस कोर्टाकडे केली होती. यानंतर चारही आरोपींना 7 दिवसांची दिल्ली पोलिसांच्या विशेष कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या चौकशीदरम्यान लोकसभेतील सुरक्षा भंगाच्या घटनेची जबाबदारी सर्व आरोपींनी स्वीकारल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Parliament security breach)

संसदेवरचा हल्ला हा योजना आणि विचारपूर्वक: दिल्ली पोलीसांची माहिती

दिल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद सुरक्षा भंग प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित झा याला गुरूवारी रात्र अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची चौकशी देखील करण्यात आली. दरम्यान संसदेवरचा हल्ला हा योजना आणि विचारपूर्वक करण्यात आल्याचे त्यांनी चौकशीनंतर स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी पुरावे गोळा करण्यासाठी अनेक राज्यात जावे लागेल. या कटासाठी वापरलेले मोबाईलही जप्त करायचे आहेत, असे देखील स्पष्ट केले.

हेही वाचा:

 

Back to top button