पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांनंतर जागतिक बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज शुक्रवारी (दि. १५) सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स १,०६१ अंकांनी वाढून ७१,५७५ वर गेला. तर निफ्टीने २१,४८० वर झेप घेतली. दोन्ही निर्देशांकांचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. त्यानंतर सेन्सेक्स ९६९ अंकांच्या वाढीसह ७१,४८३ वर बंद झाला. निफ्टी २७३ अंकांनी वाढून २१,४५६ वर स्थिरावला. आज सुमारे १,७९६ शेअर्स वाढले. तर १,४७३ शेअर्स घसरले आणि ८७ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. आजच्या तेजीत बँकिंग, फायनान्सियल आणि आयटी शेअर्स आघाडीवर राहिले.
यामुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज शुक्रवारी २.७६ लाख कोटी रुपयांनी वाढले. तसेच ते या आठवड्यात ८.55 लाख कोटी रुपयांनी वाढून ३५७.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
संबंधित बातम्या
'सेन्सेक्स'वरील टॉप गेनर्स
सेन्सेक्स आज ७०,८०४ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,६०० जवळ पोहोचला. सेन्सेक्सवर एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस हे शेअर्स प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढले. एसबीआयचा शेअर ४ टक्के, टाटा स्टील, एनटीपीसी टेक महिंद्रा हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढले. विप्रो २.७५ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, एलटी, एम अँड एम, इंडसइंड बँक, रिलायन्स हे शेअर्सही वधारले. दरम्यान, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, मारुती, आयटीसी हे शेअर्स घसरले.
निफ्टी ५० निर्देशांक आज २१,२८७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २१,४८१ अंकांपर्यंत झेप घेतली. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस यांनीही आज तेजीत व्यवहार केला. निफ्टी बँक ४८,१३० वर गेला. निफ्टीवर एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स ३.५२ ते ५.७३ टक्क्यांनी वाढले. तर नेस्ले इंडिया, एचडीएफसी लाइफ, भारती एअरटेल, बजाज ऑटो, एसबीआय लाईफ हे घसरले.
आज मुख्यतः आयटी शेअर्समध्ये मोठी तेजी राहिली. आयटी शेअर्स १० टक्क्यांहून अधिक वाढले. स्मॉलकॅपमधील झेनस्टार टेक्नॉलॉजीजचा (Zensar Technologies share price) शेअर आज १० टक्क्यांहून अधिक वाढून ५८८ रुपयांवर पोहोचला. तर मिडकॅपवर कोफोर्ज शेअर्स (Coforge Share Price) ४ टक्क्यांहून अधिक वाढून ६,४१० रुपयांवर गेला. दोन्ही शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार केला. MphasiS चा शेअर्सही आज तेजीत राहिला. आयटी शेअर्समधील जोरदार तेजीमुळे निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप या दोन्ही निर्देशांकांनी ५२ आठवड्यांच्या उच्चांक गाठला. आयटीमधील एचसीएल टेक्नॉलॉजीस (HCL Technologies), LTIMindtree, इन्फोसिस (Infosys), टेक महिंद्रा (Tech Mahindra) आणि टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (TCS) हे ५ प्रमुख शेअर्सही वाढले.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) चालू डिसेंबर महिन्यांत दररोज सरासरी ३,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. यामुळे सेन्सेक्स या महिन्यात आतापर्यंत ४ हजार अंकांनी वाढला आहे. एनएसडीएल (NSDL) आकडेवारीनुसार, या महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ३९,२६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. आता यूएस फेडने २०२४ मध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिल्याने नवीन वर्षात बाजारातील तेजीचा वारु आणखी चौफेर उधळू शकतो.
गेल्या बुधवारी यूएस फेडने २ टक्के महागाईवाढीचे उद्दिष्ट अंदाजापेक्षा लवकर गाठले जाण्याची शक्यता असल्याने पुढील आर्थिक भूमिका कडक नसल्याचे संकेत देत फेडने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. यामुळे अमेरिकेसह जगभरातील बाजारातील गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. याचे सकारात्मक पडसाद भारतीय बाजारातही दिसून येत आहेत.