अमरावती, पुढारी वृत्तसेवा : खासदार नवनीत राणा यांनी आज (दि.९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नवनीत राणा आगामी लोकसभा निवडणुक अमरावती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून लढणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. २०१९ मध्ये अमरावती लोकसभेची निवडणुक नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने लढविली होती. विशेष म्हणजे त्यावेळी देखील त्यांना उमेदवारी देण्यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांची वेगवेगळी भूमिका होती.
नवनीत राणा यांना अमरावती लोकसभेत समर्थन देण्याचा निर्णय हा अजित पवार यांनीच घेतला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा या अजित पवार गटाकडून अमरावती लोकसभेच्या उमेदवार राहणार का, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. या दरम्यानच आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या घरी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
दरम्यान या भेटी संदर्भात खासदार नवनीत राणा यांना विचारले असता त्यांनी आपण व आपला पक्ष एनडीएचा घटक असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री हे जिल्ह्यामध्ये आले असल्यामुळे खासदार म्हणून मी त्यांचे स्वागत केले आणि त्यासाठीच भेट घेतली असे त्या म्हणाल्या. "आमचा पक्ष युवा स्वाभिमान आहे आणि मी त्याच पक्षाची खासदार आहे. मागील निवडणुकीत त्यांचा (राष्ट्रवादी काँग्रेसचा) आम्हाला सपोर्ट होता. आम्ही नेहमी अजितदादा सोबतच होतो. त्यांनी मला एकदा समर्थन दिले, तिकीट दिली, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे", असेही खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
हेही वाचलंत का?