नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: महादेव ऍप संबंधित प्रकरणावरुन होत असलेली ईडीची कारवाई ही छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि ओबीसी मुख्यमंत्री असलेले भूपेश बघेल यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार आहे. देशाच्या पंतप्रधानांनीच रचलेला हा कट आहे. असा गंभीर आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकार आणि भाजपवर आगपाखड केली आहे. (Congress on BJP)
भाजपची ईडीसोबत युती आहे. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, ही युती आणखी घट्ट होत आहे. कारण भाजप पराभवाकडे वेगाने वाटचाल करत आहे. भूपेश बघेल हे देशातील एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. महादेव ऍपच्या मुद्द्यावर राज्याच्या बाहेर जाऊन चौकशी करणारे छत्तीसगड हे पहिले राज्य आहे. छत्तीसगडसह, मध्य प्रदेश, ओडिशा, दिल्ली या राज्यांमध्ये छत्तीसगड सरकारने कारवाई केली आहे, असा दावा काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संघटना सरचिटणीस, के. सी. वेणुगोपाल, वरिष्ठ नेते आणि विधिज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी, सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. (Congress on BJP)
छत्तीसगड सरकारने केलेल्या कारवाईबद्दल अधिक माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधिज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, छत्तीसगड पोलिसांनी ४५० पेक्षा अधिक लोकांना अटक केली. त्यात १९१ लॅपटॉप, ८६५ मोबाईल अशे दीड कोटींहून अधिक रुपयांचे साहित्य, ४१ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली. या संदर्भातील पहिला खटला मार्च २०२२ मध्ये दाखल झाला. तसेच या प्रकरणात नाव आलेले आणि दुबईमधून या ऍपचा कारभार बघणारे रवी उप्पल, सौरभ चंद्रहार यांना अटक करण्याची मागणीही भूपेश बघेल यांनी केली आहे, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले. (Congress on BJP)
छत्तीसगडमधून या ऍपची कसलीही हालचाल नाही, असेही पोलीस तपासात निष्पन्न झाले. मात्र याच प्रकरणावर ईडी दीड वर्षांनी कारवाई करते जेव्हा निवडणुकीला चार दिवस बाकी आहेत. प्रत्येक काँग्रेस नेत्याच्या घरासमोर ईडी उभी आहे. अटकेत असलेले एखादे पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांविरुद्ध आरोप करतात, तेही निवडणुकीच्या काळात हे कसे शक्य आहे? यापुर्वी असे कधी झाले होते का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केली. (Congress on BJP)
पुढे बोलताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र, प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या घरी छापे टाकले गेले. तिथे काही मिळाले नाही याउलट केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असलेल्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले गेले. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ईडी आणि आयकर विभाग भाजपची शस्त्रे बनतात, कर्नाटक निवडणुकीत १०० पेक्षा जास्त उमेदवारांवर छापे टाकण्यात आले. ते होऊन आता ८-९ महिन्यांचा कालावधी लोटला मात्र त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहिती नाही, छत्तीसगड राज्यात ७ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यापुर्वी ईडी छत्तीसगडमध्ये कारवाई करत आहे.
दरम्यान, पाचही राज्यात काँग्रेस निवडणुका जिंकत आहे, ही लोकभावना आहे. भाजपला लक्षात आले आहे की, आपल्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळे त्यांचे एकमेव शस्त्र ईडी त्यांनी बाहेर काढले आहे, असा घणाघातही सरचिटणीस जयराम रमेश काँग्रेसने केला.