

पुढारी ऑनलाईन डेस्क : युवकांनी आठवड्याला ७० तास काम केले पाहिजे, असे मत व्यक्त करणारे उद्योगपती एन. आर. नारायण मूर्ती यांनी कामाच्या तासांबद्दल नवे वक्तव्य केले आहे. इन्फोसिसची स्थापना केल्यानंतर कंपनीसाठी आठवड्याला ९० तास काम केले आहे आणि हे काम वाया गेले नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. १९९४पर्यंत मी अशाच प्रकारे काम करत होतो, असे ते म्हणाले आहेत.
मूर्ती यांनी इकॉनॉमिक टाइम्सला मुलाखत दिली आहे, यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. (Naryan Murthy on Work Hours)
ते म्हणाले, "मी सकाळी ६.२० ला ऑफिसला पोहोचत होतो, त्यानंतर रात्री ८.३०ला मी ऑफीसमधून बाहेर पडत होतो. जे देश आज समृद्ध बनले आहेत, ते कष्टातूनच बनले आहेत. माझ्या पालकांनी मला एकच शिकवलं होतं, गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे अपार कष्ट."
मी ४० वर्ष व्यावसायिक जीवनात आहे, माझ्या संपूर्ण कार्यकाळात आठवड्याला ७० तास काम केले आहे. १९९४पर्यंत आमच्या कंपनीत सहा दिवसांचा आठवडा होता, तोपर्यंत मी ८५ ते ९० तास काम करत होतो, आणि ही कष्ट वाया गेले नाहीत, असे ते म्हणाले.
इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी मूर्ती यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी भारतात कामतील उत्पादकता वाढणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. "दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील लोकांनी जास्त काम केले होते. भारतातील तरुणांनीही देशाची जबाबदारी घेतली पाहिजे."
मूर्ती यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होतो. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बड्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींनी मूर्ती यांचे समर्थन केले होते. तर जास्त तास काम केल्याने उत्पादकता वाढते असे नाही, असे मतही अनेकांनी व्यक्त केले होते.
हेही वाचा