MP News : मध्य प्रदेशात भाजपला मतदान केल्याने मुस्लीम वहिनीला मारहाण; दीराविरूद्ध गुन्हा दाखल | पुढारी

MP News : मध्य प्रदेशात भाजपला मतदान केल्याने मुस्लीम वहिनीला मारहाण; दीराविरूद्ध गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान केल्यामुळे दीराने मुस्लीम वहिनीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दीराविरुद्ध अनेक कलमाखाली गुन्हा दाखल केला. ही घटना अहमदपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बारखेडा हसन गावात घडली. (MP News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बारखेडा हसन गावात ३० वर्षीय समीना पती बबलूसोबत राहते. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बहन योजनेचा लाभ समीनाला मिळाला आहे. या रकमेतून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. याच कारणामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे समीनाने सांगितले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने विजय मिळविल्याने तिला आनंद झाला. आनंद व्यक्त करताना तिने कुटुंबियांना सीएम शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारला मतदान केल्याचे सांगितले. त्यामुळे राग अनावर झालेल्या दीराने तिला मारहाण केली. (MP News)

MP News : घटना ऐकून अधिकारी हादरले

मारहाण केल्यानंतर पीडित महिला अहमदपूर पोलीस ठाण्यात गेली. मात्र, तिचे काहीही ऐकून घेतले नाही. पोलीस ठाण्यात अनेक फेऱ्या मारून ती थकली. त्यानंतर ती वृद्ध वडील रईस यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, भाजपला मतदान केल्यामुळे दीराने आपल्याला मारहाण केली. आता मी तुमच्याकडे न्यायासाठी आलो आहे. हे ऐकून तेथे उपस्थित अधिकारी आश्चर्यचकित झाले. मी भाजपच्या योजनांचा लाभ घेते, असेही तिने अधिकाऱ्यांना सांगितले.

मलाही लाडली बहन योजनेचा लाभ मिळत आहे. याचा फायदा माझ्या मुलांना झाला. त्यामुळेच मी भाजपला मतदान केले. पोलीस या महिलेचे म्हणणे ऐकत नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. या सूचनांनंतर अखेर अहमदपूर पोलीस ठाण्यात आरोपी दीराविरुद्ध कलम २९४, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button