Madhya Pradesh Election Results : मध्य प्रदेशात भाजपची निर्णायक आघाडी, शिवराज सिंह चौहान पुन्हा होणार मुख्यमंत्री | पुढारी

Madhya Pradesh Election Results : मध्य प्रदेशात भाजपची निर्णायक आघाडी, शिवराज सिंह चौहान पुन्हा होणार मुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : Madhya Pradesh Election Results : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या हाती निराशा आली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत राज्यातील सर्व 230 जागांच्या मतमोजणीत भाजप 157 जागांवर आघाडीवर आहे. यावरून भाजपची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे. राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकारने महिला आणि मुलींसाठी सुरू केलेल्या ‘लाडली बहना’ आदी योजनांचा जनतेवर मोठा परिणाम झाल्याचे भाजप नेत्यांचे मत आहे. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला फायदा झाला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अमित शाह यांची अचूक रणनीती, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे मिळालेलं मार्गदर्शन, त्याला मिळालेला प्रतिसाद, संघटनेचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे निवडणुकीला वेग आला. त्यामुळेच आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. हे जनतेचे भाजपवरील प्रेम आहे.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने केलेल्या कामाची आम्ही मध्य प्रदेशमध्ये योग्यरीत्या अंमलबजावणी केली. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मीपासून लाडली बेहना अशा योजना आणल्या. त्यामुळे गरिबांसाठी, भाचे-भाच्यांसाठी काम झाले. या कामानेही जनतेची मने जिंकली. तसेच मध्य प्रदेश एक कुटुंब बनला, अशी भावनाही शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना हा मध्य प्रदेशच्या जनतेचा विजय असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, ‘आमच्या सेवेचे आणि सुशासनाला जनतेचा पूर्ण आशीर्वाद मिळाला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होईल.’ (Madhya Pradesh Election Results)

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबळ भागात ज्योतिरादित्य सिंधिया खूप लोकप्रिय आहेत. या भागातून एकूण 34 जागा आहेत, जिथे सिंधिया यांचा मोठा प्रभाव आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चमकदार कामगिरी करत येथून 26 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला केवळ 7 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा सिंधिया हे काँग्रेसमध्ये होते. आता सिंधिया भाजपमध्ये आहेत. पक्षात प्रवेश केल्यावर सिंधिया यांनी अनेक काँग्रेस आमदारांनाही सोबत आणले. सिंधिया यांनी मार्च 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. (Madhya Pradesh Election Results)

शिवराज सिंह चौहान यांची लाडली बहना योजना 5 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आली. तरुण महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना चांगल्या भविष्याकडे नेण्यावर लक्ष केंद्रित करणारी ही योजना अधिक चांगले सहाय्य प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या योजनेतील मासिक भत्ता रक्कम 1,000 रुपयांवरून 1,250 रुपये केला. त्याचा फायदा या विधानसभा निवडणुकीत दिसून आल्याचे चित्र आहे.

Back to top button