Rajasthan New CM : राजस्‍थान मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीतून बाबा बालकनाथ बाहेर!, कारणही केले स्‍पष्‍ट | पुढारी

Rajasthan New CM : राजस्‍थान मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीतून बाबा बालकनाथ बाहेर!, कारणही केले स्‍पष्‍ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले. मात्र गेली सहा दिवस राज्‍यातील मुख्‍यमंत्री पदासाठीचा चेहर्‍यावर शिक्‍कामोर्तब करण्‍यात पक्षश्रेष्‍ठींना यश आलेले नाही. ( Rajasthan New CM) दरम्‍यान, राजस्‍थान मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीतून बाबा बालकनाथ यांनी माघार घेतली आहे. त्‍यांनी सोशल मीडियावर पोस्‍ट करत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

राजस्‍थान मुख्‍यमंत्रीपदासाठी बाबा बालकनाथ यांच्‍या नावाची चर्चा होती. त्‍यांनी तिजारा विधानसभा मतदारससंघातून निवडणूक लढवली होती. आता बाबा बालकनाथ यांनी एक निवेदन जारी करून आपण मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्यतीमध्‍ये नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

Rajasthan New CM : चर्चांकडे दुर्लक्ष करा…

बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर्चेकडे दुर्लक्ष केले. बाबा बालकनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच जनतेने खासदार आणि आमदार बनवून देशसेवेची संधी दिली आहे. निवडणूक निकाल आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे.

Rajasthan New CM : भाजपच्‍या ‘या’ नेत्‍यांची नावे चर्चेत

राजस्‍थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्‍पष्‍ट बहुमत मिळवल्‍यानंतर मुख्‍यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करावी, हा पेच पक्षश्रेष्‍ठींसमोर कायम आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मुख्‍यमंत्रीपदाच्‍या नावावर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित होते. मात्र गेली सहा दिवस यावर विचारमंथन सुरु आहे. पक्षाच्‍या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांनी मागील दोन दिवसांमध्‍ये ७० आमदारांशी चर्चा केली आहे. या सर्व आमदारांनी वसुंधरा यांना पाठिंबा दिला असल्‍याचा दावा त्‍यांच्‍या समर्थकांनी केला आहे. दरम्‍यान, राजस्‍थानच्‍या मुख्‍यमंत्रीपदाच्‍या शर्थतीमध्‍ये रेल्‍वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभा सभापती ओम बिर्ला, बाबा बालक नाथ आणि दिया कुमारी यांची नावे चर्चेत होती. आता बाबा बालकनाथ यांनी यातून माघार घेतली आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button