शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अयोध्येचे जुळले नाते; गागा भटांचे वंशज करणार प्राणप्रतिष्ठा | पुढारी

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक आणि अयोध्येचे जुळले नाते; गागा भटांचे वंशज करणार प्राणप्रतिष्ठा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जानेवारी महिन्यात अयोध्येत राम मंदिराची उभारणी पूर्ण होणार आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वाराणसी येथील पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या नेतृत्त्वाखाली होणार आहे. ८६ वर्ष वय असणारे दीक्षित वैदिक विधी शास्त्राचे गाढे अभ्यासक आहेत. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे पंडित गागा भट यांचे ते वंशज आहेत.

२२ जानेवारीला राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी १२१ पुजाऱ्यांवर आहे, त्यांचे नेतृत्व दीक्षित करणार आहेत. प्राणप्रतिष्ठा १६ ते २२ जानेवारी या कालावधित होणार आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. दीक्षित म्हणाले, “हा माझ्यासाठी आर्शीवाद आहे. प्राणप्रतिष्ठेतील पूजाअर्चांवर देखरेख ठेवण्याचे काम माझ्याकडे आहे, प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मी ही जबाबदारी पार पाडणार आहे.”

सप्टेंबर महिन्यात कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांनी काही धर्मगुरुंना अयोध्येत पाठवले होते. यामध्ये दीक्षित आणि आचार्य गणेशशास्त्री द्रविड यांचा समावेश होता.

अयोध्येतील राम मंदिरात १६ जानेवारीला महापूजा होईल. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रायश्चित होम, दशविध स्नान इत्यादी विधी होतील, त्यानंतर १७ तारखेला जलयात्रा, तीर्थ, कलशपूजन, कलश यात्रा हे विधी होतील. २२ तारखेला होणारे धार्मिक विधीही दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली होतील.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि गागा भट

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ला झाला. काशी येथील गागा भट यांच्या नेतृत्वाखाली राज्याभिषेकाचे विधी झाले होते. दीक्षित हे गागा भट यांचे वंशज आहेत, हा एक विलक्षण योग जुळून आलेला आहे.

हेही वाचा

Back to top button