अयोध्येतील राम मंदिरातील पुजार्‍यांच्या 20 जागांसाठी आले 3 हजार अर्ज | पुढारी

अयोध्येतील राम मंदिरातील पुजार्‍यांच्या 20 जागांसाठी आले 3 हजार अर्ज

लखनौ; वृत्तसंस्था : एकीकडे अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी सुरू झाली असताना दुसरीकडे श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टने मंदिरातील पुजार्‍यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रस्टने दिलेल्या जाहिरातीला प्रचंड प्रतिसाद मिळााला असून पुजार्‍यांच्या 20 जागांसाठी 3 हजार अर्ज आले आहेत. त्यातून 20 जणांची अंतिम निवड होणार आहे.

ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिरात 20 पुजारी नेमले जाणार आहेत. याशिवाय मंदिरातील विविध कामांसाठीही काही पदे भरावयाची आहेत. यासाठीच्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पुजार्‍यांच्या पदांसाठी 3 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्या अर्जांची छाननी करून 200 जणांची निवड करण्यात आली. या 200 जणांच्या मुलाखती अयोध्येतील कारसेवकपुरम येथे घेण्यात आल्या.

वृंदावन येथील प्रमुख पुजारी जयकांत मिश्रा, अयोध्येतील महंत मिथीलेश नंदीनी शरण आणि सत्यनारायण दास या तिघांच्या टीमने या मुलाखती घेतल्या.या मुलाखतीतून 20 जणांची निवड केली जाणार असून त्यांना सहा महिने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Back to top button