पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज ३ ऱ्या दिवशी द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार (DMK MP DNV Senthilkumar) यांनी भाजपवर केलेल्या 'गोमूत्र' टिप्पणीवरून लोकसभेत गदारोळ झाला. यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार (DMK MP DNV Senthilkumar) यांच्या विधानावरून मोठा गदारोळ सुरू आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागावी अशी मागणी अनेक राजकीय नेत्यांनी केली आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनीही सेंथिल कुमार यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भाजप खासदार साध्वी निरंजन ज्योती सेंथिलकुमार यांच्या 'गौमूत्र' टिप्पणीवर म्हणाल्या की, "कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार होते हे ते विसरले आहेत. कर्नाटकात भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत. तेलंगणातून आमचे ३ खासदार आहेत, ८ आमदार निवडून आले आहेत. त्यांनी भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करू नये. मला आशा आहे की सोनिया गांधी या प्रकरणी स्पष्टीकरण देतील."
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयावर द्रमुकचे खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार (DMK MP DNV Senthilkumar) मंगळवारी लोकसभेत बोलत होते. हिंदी भाषिक राज्यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, भाजप फक्त हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्येच विजय नोंदवू शकतो. ज्या हिंदी राज्यांना आपण सामान्यतः 'गोमूत्र' राज्य म्हणतो, त्या हिंदी राज्यांमध्येच निवडणुका जिंकण्या एवढी भाजपची ताकद आहे. याचा विचार देशातील जनतेने केला पाहिजे, असे सेंथिलकुमार म्हणाले होते. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये भाजपच्या कामगिरीवरही भाष्य केले होते.
हेही वाचा :