रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्‍यमंत्री, उद्या शपथविधी होण्याची शक्यता | पुढारी

रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्‍यमंत्री, उद्या शपथविधी होण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणाच्‍या मुख्‍यमंत्रीपदी ( Telangana Chief Minister ) काँग्रेस नेते आणि तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्‍या नावावर काँग्रेसने शिक्‍कामोर्तब केल्‍याचे वृत्त आहे. राज्यासाठी लढाईचे नेतृत्व करणारे आणि थेट केसीआरकडे लढा देणारे रेड्डी बुधवार किंवा गुरुवारी शपथ घेण्‍याची शक्‍यता असल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तम कुमार रेड्डी आणि भट्टी विक्रमार्का यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकेत, असे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

Telangana Chief Minister : कोण आहेत रेवंत रेड्डी ?

तेलंगणामध्‍ये यंदाची विधानसभा निवडणूक ही के चंद्रशेखर राव विरुद्ध काँग्रेस, अशी नाही तर के.चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी अशी रंगली होती. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मुख्‍यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना आव्‍हान देणारे रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. यानंतर त्‍यांनी के.चंद्रशेखर राव यांच्‍या तेलंगणा राष्‍ट्र समितीमध्‍ये प्रवेश केला होता. २००४ मध्ये कलवाकुर्ती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्‍याची इच्‍छा त्यांनी व्‍यक्‍त केली; परंतु त्यांना तिकीट नाकारले गेले. कारण या निवडणुकीत तेलंगणा राष्‍ट्र समितीची काँग्रेससोबत आघाडी होती. जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ काँग्रेसकडे देण्‍यात आला होता. तिकिट नाकारल्‍याने रेवंत रेड्डी तेलंगणा राष्‍ट्र समितीमधून बाहेर पडले.

2006 मध्ये रेवंत रेड्डी यांनी अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यांची लढत प्रबळ प्रतिस्पर्धी संकीरेड्डी जगदीश्वर रेड्डी यांच्याशी  होती. ही निवडणूक त्‍यांनी  २० पेक्षा कमी मतांनी जिंकली होती.

तेलगु देसम पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्‍ये प्रवेश

तेलंगणा राष्‍ट्र समितीमधून बाहेर पडल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्‍या तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. २००९ आणि २०१४ मध्‍ये त्‍यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. २०१५ मध्‍ये कॅश फॉर व्होट घोटाळ्यात त्‍यांना अटकही झाली होती. एमएलसी निवडणुकीत आपल्या मतांवर प्रभाव टाकण्यासाठी नामनिर्देशित आमदाराला लाच दिल्याचा आरोप त्‍यांच्‍यावर होता. स्‍वंतत्र राज्‍य निर्मितीनंतर तेलंगणात तेलगू देसम पार्टीचा प्रभाव कमी होत गेला. यानंतर रेवंत यांनी ऑक्टो‍बर २०१७ मध्‍ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Revanth Reddy: अल्‍पवधीत काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी झेप

अल्‍पवधीतच रेवंत यांचा काँग्रेसमधील वाढत्या प्रभावाची के. चंद्रशेखर राव यांना जाणीव झाली. त्‍यामुळे २०१८ मध्‍ये कोडंगल विधानसभा निवडणूकीत त्‍यांचा पराभव करण्‍यासाठी राव यांनी आपले सर्वस्‍व पणाला लावले होते. त्‍यांनी केलेल्‍या प्रयत्‍नामुळेच रेवंत यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. यानंतर रेवंत यांनी २०१९ मध्‍ये मलकाजगिरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. ते खासदार झाले. यानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्‍यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍त केले. यंदाच्‍या निवडणुकीत ते काँग्रेसचे स्टार प्रचारक असल्याने त्‍यांनी कोडंगल आणि कामारेड्डी या मतदारसंघामधील प्रचाराची जबाबदारी आपल्‍या दोन भावांवर सोपवली होती.

के चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी

प्रदेशाध्‍यक्षपदाच्‍या धुरा संभाळल्‍यानंतर रेवंत यांनी के. चंद्रशेखर राव यांच्‍यावर हल्‍लाबोल सुरु केला. तेलंगणा राज्‍य निर्मितीचे संपूर्ण श्रेय काँग्रेसच्‍या नेत्‍या सोनिया गांधी यांना जाते. त्‍यांनी आंध्र प्रदेशमधील सत्ता सोडत तेलंगणा राज्‍याची निर्मिती केली, असे प्रचार करत त्‍यांनी के. चंद्रशेखर राव यांचे महत्त्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. ३ डिसेंबरला ( तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाचा दिवस ) के. चंद्रशेखर राव राजकारणातून निवृत्त होतील. राज्‍यातील विविध भ्रष्‍टाचार प्रकरणी यापुढे त्‍यांचा मुक्‍काम चेर्लापल्‍ली कारागृहात असेल, असा दावा रेवंत रेड्डी यांनी केला होता.

हेही वाचा : 

 

 

Back to top button