पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणा देशातील नवखे राज्य. आंध्र प्रदेशचे विभाजन होवून या राज्याची स्थापना २ जून २०१४ रोजी झाली. केवळ ९ वर्ष वय असणारे हे राज्य. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या मागणीसह राज्याच्या स्थापनेपर्यंत राजकारणात एकच चेहरा मुख्य होता तो म्हणजे सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर). या राज्याचे संस्थापक अशी त्यांची राजकारणातील ओळख. २०१४ मध्ये ११९ पैकी ६३ जागा जिंकून चंद्रशेखर राव यांनी सत्ता काबीज केली. २०१८ मध्ये (एक वर्ष निवडणूक आधी घेण्यात आली) चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला ११९ पैकी ८८ जागा मिळाल्या होत्या. (Telangana Assembly Election 2023) तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी सलग दोनवेळा राज्यात सत्ता काबीज केली. मात्र त्यांना 'हॅटट्रिक' पासून (सलग तिसर्यांदा सत्ता स्थापन करण्यापासून) वंचित ठेवले आहे ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी. जाणून घेवूया केसीआर यांच्या पराभवाची मुख्ये कारणे…
मागील काही महिन्यांपूर्वी राज्यात केसीआर यांच्याविरोधात कोणतीही विरोधाचे वातावरण दिसत नव्हते. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात बीआरएसला मोठी आघाडी दिली. केसीआर यांनी तेलंगणामध्ये रयतु बंधू आणि दलित बंधू या महत्त्वाकांक्षी योजनांची मोठी चर्चा झाली. या योजना रोख पैसे हस्तांतरणाच्या होत्या. मात्र या योजनांचा शेतकर्यांना लाभच झाला नाही, असा प्रभावी प्रचार करण्यात काँग्रेसला यश आले. केसीआर यांनी मागील दहा वर्षांत राज्यात सिंचन क्षेत्रात भरीव काम केले आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढविले. तांदळाचे उत्पादन वाढले. पण चंद्रशेखर राव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. पुत्र रामाराव हे मंत्री असून, तेच सरकारचा कारभार चालवितात, अशी टीका केली गेली. त्यांच्या मंत्रीमंडळात भाचे हरिश राव हे वित्त आणि आरोग्यमंत्री होते. मुलगी कविता या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले.
केसीआर यांच्या सरकारच्या काळात राज्याने केलेले प्रगती आणि त्यांनी दिलेल्या आश्वासन यामधील तफावत विरोधी पक्षांनी मांडली. अशातच केसीआर यांचे पुत्र केटी रामाराव यांनी स्थापन केलेली स्थानिक व्यवस्था लोकांना केसीआर यांच्यावरील भ्रष्टाचाराबद्दलच्या आरोपांपेक्षा अधिक त्रासदायक वाटते. बीआरएस आमदारांच्या भ्रष्टाचाराचा आणि उद्दामपणाला लोक कंटाळल्याची प्रचार काळात चर्चा होती. तसेच राज्यात रयतु बंधू आणि दलित बंधू या रोख हस्तांतरण योजनांपैकी काही योजनांमुळे आपापल्या गटातटांना प्राधान्य दिले गेल्याचा मोठा फटका के. चंद्रशेखर राव यांना बसला.
तेलंगणा राज्यात रोजगारची स्थिती अत्यंत गंभीर आहे. यामुळे विधानसभा निवडणूक प्रचारात तरुण मतदारांमध्ये संतापाची लाट दिसत होती.
स्वतंत्र राज्याच्या स्थापनेनंतर के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यांनी भाजपशी संधान साधले. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्याने केसीआर यांनी भाजपला मदत केली. मात्र राज्यात काँग्रेसची ताकद कमी झाल्याची पोकळी भरण्याचा प्रयत्न भाजप करु लागला. त्यातूनच भाजपने चंद्रशेखर राव यांची कोंडी करण्यास सुरुवात केली. गेल्या हंगामात तेलंगणातील भात खरेदी करण्यास केंद्राने नकार दिला. तेव्हापासून भाजप आणि चंद्रशेखर राव यांचे चांगलेच बिनसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हैदराबाद दौऱ्यावेळी सलग चारवेळा चंद्रशेखर राव उपस्थित राहणे टाळले. यानंतर चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांच्याविरोधात दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने कारवाई केली होती. यानंतर भाजपबरोबरील त्याचे संबंध अधिकच बिघडले आणि काँग्रेसबरोबरच भाजपबरोबरही त्यांना संघर्ष करणे अनिवार्य ठरले.
हेही वाचा :