Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्‍ये आता मुख्‍यमंत्रीपदासाठी रस्सीखेच, ‘या’ नावांची चर्चा | पुढारी

Rajasthan Election Results 2023: राजस्थानमध्‍ये आता मुख्‍यमंत्रीपदासाठी रस्सीखेच, 'या' नावांची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच पैकी चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्‍या राज्यांचे कल आता स्‍पष्‍ट हाेत आहेत. राजस्थानात भाजप ११३ जागांसह निर्णायक आघाडीवर मुसंडी मारतोय. या निर्णायक आघाडीमुळे राजस्थानमध्‍ये भाजपचा  मुख्यमंत्रीपदाचा चेहरा काेण असणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Rajasthan Election Results 2023)

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) ११३ जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडचे रुपांतर निवडणुकीच्या निकालात केले तर भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करत असल्याचे चित्र आहे.भाजपने राजस्थानची निवडणूक मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही नेता पुढे न करता लढवली होती. वसुंधरा राजे या २००३ पासून राजस्थानमध्ये भाजपचा चेहरा आहेत. मात्र यावेळी पक्षाने सत्ता आल्‍यास मुख्‍यमंत्रीपद चेहरा काेण असेल हे गुलदस्‍त्‍यातच ठेवले हाेते. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून बालकनाथ यांचे नाव समोर आले आहेत; पण राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बालकनाथ यांच्याशिवाय आणखी कोण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार या चर्चा देखील रंगल्या आहेत. Rajasthan Election Results 2023)

बाबा बालकनाथ की अन्य कोण मुख्यमंत्री?

बाबा बालकनाथ

तिजारा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बालकनाथ हे भाजपचे खासदार आहेत. तसेच अशोक गेहलोत यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बालकनाथ हा दुसरा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून समोर आला आहे. इंडिया टुडे/ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार १० टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी बाबा बालकनाथ यांना पहिली पसंती दिली आहे. ते राजस्थानात भाजपचा लोकप्रिय चेहरा आहेत. बालकनाथ हे त्याच नाथ पंथाचे आहेत. या पंथातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात. नाथ संप्रदायाच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यानंतर बालकनाथ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना राजस्थानचे योगी देखील म्हटले जाते. म्हणून ते राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक असल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दिया कुमारी

जयपूर राजघराण्यातील दिया कुमारी यांच्याकडेही वसुंधरा राजे सिंधिया यांचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. दिया कुमारी या खासदार असून यावेळी भाजपने त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली आहे. दिया कुमारी यांनी जयपूर जिल्ह्यातील विद्याधरनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. हा मतदारसंघ राजस्थानातील भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपच्या महाराणी वसुंधरा राजे यांना पर्याय म्हणून महाराणी दिया कुमारी यांच्याकडे पाहिले जात आहे. या चर्चेला देखील उधाण आले आहे.

सी. पी जोशी

राजस्थान भाजपचे अध्यक्ष सीपी जोशी यांचाही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत समावेश असल्याचे मानले जात आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने सीपी जोशी यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा एनडीए आघाडीतून घेतली. सीपी जोशी हेही खासदार असून त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवल्याने त्यांची हायकमांडशी जवळीक असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्यामुळे त्याच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button