Telangana Assembly Election Results 2023 | तेलंगणात KCR ला धक्का, काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा | पुढारी

Telangana Assembly Election Results 2023 | तेलंगणात KCR ला धक्का, काँग्रेसने पार केला बहुमताचा आकडा

पुढारी ऑनलाईन : तेलंगणातील ११९ जागांचे निकाल आज रविवारी (दि.३) जाहीर होत आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, तेलंगणात काँग्रेसने ६१ जागांवर आघाडी घेतली आहे. याचाच अर्थ काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या नेतृत्त्वाखालील भारत राष्ट्र समितीला धक्का बसताना दिसत आहे. बीआरएस ३६ जागांवर आघाडीवर आहे. भाजप १०, एमआयएम आणि सीपीआय प्रत्येकी १ जागेवर पुढे आहे. तेलंगणातील बीआरएसचे अनेक मंत्री पिछाडीवर आहेत. त्यात इंद्रकरण रेड्डी, कोप्पुला ईश्वर, वेमुला प्रशांत रेड्डी, दयाकर राव, निरंजन रेड्डी आणि इतरांचा समावेश आहे. (Telangana Assembly Election Results 2023)

संबंधित बातम्या 

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी गजवेल आणि कामारेड्डी या दोन ठिकाणांवरुन निवडणूक लढवली आहे. केसीआर गजवेल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. पण कामारेड्डीमध्ये ते पिछाडीवर आहेत.

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत गजवेल मतदारसंघात माजी मंत्री एटेला राजेंद्र भाजपचे उमेदवार आहेत तर काँग्रेसने थुमकुंता नरसा रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. २०१८ मध्ये केसीआर यांनी गजवेल मधून सुमारे ५८ हजार मतांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी काँग्रेसच्या वंतेरू प्रताप रेड्डी यांचा पराभव केला होता.

निवडणूक प्रचारादरम्यान बीआरएसने मागील काँग्रेस सरकारच्या अपयशांवर आणि शेतकरी, महिलांसाठी चालवल्या जात असलेल्या कल्याणकारी योजनांवर भर दिला होता. तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा मुद्दाही राव यांनी उपस्थित केला. पण केसीआरची जादू यावेळी जनतेवर चालू शकली नसल्याचे दिसते. (Telangana Assembly Election Results 2023)

२०१८ च्या निवडणुकीत टीआरएसने ८८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस १९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. तर तेलगू देसम पक्षाला केवळ दोन जागा मिळाली होती. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) ने सात जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ एक जागा जिंकता आली होती.

Back to top button