Assembly Election Results 2023 | मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप, तर तेलंगणामध्ये काँग्रेस मजबूत, छत्तीसगडमध्ये कांटे की टक्कर | पुढारी

Assembly Election Results 2023 | मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप, तर तेलंगणामध्ये काँग्रेस मजबूत, छत्तीसगडमध्ये कांटे की टक्कर

पुढारी ऑनलाईन : राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज रविवारी (दि.३) जाहीर होत आहेत. चार राज्यांतील निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. तेलंगणामध्ये काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपने बहुमताची आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. (Assembly Election Results 2023)

संबंधित बातम्या 

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी ९.४५ पर्यंत राजस्थानमध्ये भाजप ५२ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ३४ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेसने १५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्त्वाखालील भारत राष्ट्र समिती (BRS) ९ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने १ जागेवर आघाडीवर आहे.

मध्य प्रदेशात भाजप ७३ आणि काँग्रेस २८ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागापैंकी काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ११ जागांवर आघाडीवर आहेत.

सचिन पायलट पिछाडीवर

राजस्थानमधून काही धक्कादायक निकाल समोर येत आहेत. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट टोंक मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरामधून आघाडीवर आहेत तर झालरपाटणमधून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर आहेत. (Assembly Election Results 2023)

मोहम्मद अझरुद्दीन आघाडीवर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कामारेड्डीतून पिछाडीवर असले तरी गजवेलमधून आघाडीवर आहेत. तेलंगणातील ज्युबली हिल्समधून निवडणूक लढवणारे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेशात भाजपला सत्ता मिळणार- ज्योतिरादित्य शिंदे

भाजप राज्यात पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशात झालेल्या विकासामुळे जनता भाजपला आशीर्वाद देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू.”

Back to top button