Stock Market Updates | Exit Poll नंतर शेअर बाजारात उत्साह, Nifty चा विक्रमी उच्चांक | पुढारी

Stock Market Updates | Exit Poll नंतर शेअर बाजारात उत्साह, Nifty चा विक्रमी उच्चांक

पुढारी ऑनलाईन : सप्टेंबर तिमाहीत भारताने अपेक्षेपेक्षा चांगली ७.६ टक्के जीडीपी वाढ नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज शुक्रवारी (दि.१) जोरदार तेजी दिसून आली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ६७,४९९ वर पोहोचला. तर निफ्टी ५० ने (Nifty50) नवीन विक्रमी उच्चांक नोंदवत १४२ अंकांच्या वाढीसह २०,२७५ वर झेप घेतली. सप्टेंबर तिमाहीत अपेक्षेपेक्षा वेगवान आर्थिक वाढीमुळे जागतिक व्याजदराच्या दृष्टीकोनातून आशादायी चित्र निर्माण झाले आहे. तसेच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलचे निकाल राजकीय स्थिरतेची अधिक शक्यता दर्शवत असल्यानेही गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. (Stock Market Updates)

परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारात खरेदीसाठी परतल्याने तसेच दोन राज्यांमध्ये भाजपची आघाडी दाखवणारे एक्झिट पोल, कर संकलनातील मजबूत वाढ आणि आठ प्रमुख उद्योगांमधील सुधारित कामगिरीमुळेही बाजारातील उत्साह वाढला आहे.

संबंधित बातम्या 

विप्रो, इन्फोसिस आणि एचसीएल टेक वगळता सेन्सेक्सवरील सर्व शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. एनटीपीसीचा शेअर ४.४२ टक्क्यांनी वाढून २७२ रुपयांवर गेला आहे. ॲक्सिस बँक, आयटीसी, एलटी, ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, पॉवर ग्रिड, एसबीआय, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स वधारले आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था सप्टेंबर तिमाहीत ७.६ टक्क्यांनी वाढली आहे. जी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ६.५ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. देशातील अर्थव्यवस्थेला उत्पादन वाढीमुळे उभारी मिळाली आहे. याचे सकारात्मक पडसाद बाजारात दिसून येत आहेत. (Stock Market Updates)

काल केला नफा बुक, आज टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स घसरले

टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज एनएसई (NSE) वर सुमारे ६.५४ टक्क्यांनी घसरून १,२२७ रुपयांवर आला. कारण गुरुवारी या शेअर्सच्या बंपर लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी नफा बुक केला होता. गुरुवारी शेअर बाजारात पदार्पण करताना या शेअरने ५०० रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत शेअरने तब्बल १८० टक्क्यांनी वाढ नोंदवली होती. टाटा टेकच्या शेअर्सने काल ट्रेडिंग सत्र बंद होण्यापूर्वी पदार्पणातच १,४०० रुपयांवर व्यवहार करत उच्चांक गाठला होता. त्यानंतर हा शेअर १,३१३ रुपयांवर बंद झाला होता.

Back to top button