हैदराबाद, वृत्तसंस्था : निवडणुकीचा प्रचार संपुष्टाला आलेला असताना तेलंगणामध्ये 50 वर जागांवर बीआरएस-काँग्रेस अशी थेट वाटत असलेली निवडणूक आता तिरंगी झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांच्या धुवाँधार प्रचाराने भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे.
बीआरएस नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या मुकाबल्यात काँग्रेससह भाजपनेही नवे नेतृत्व समोर आणलेले आहे. विजयानंतर ही फळी मुख्यमंत्रिपदाची दावेदार असणे शक्य आहे.
मतमोजणीअंती बीआरएसने आघाडी घेतली तर केसीआर यांच्या मुख्यमंत्रिपदाची ती हॅट्ट्रिक ठरेल. तशी ती होऊ नये म्हणून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शक्ती पणाला लावलेली आहे. काँग्रेसने कर्नाटकमधील आपल्या 75 टक्के मंत्र्यांची तेनात तेलंगणा निवडणुकीत लावलेली, तर दुसरीकडे भाजपच्या प्रचाराची धुरा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हाती घेतलेली होती.
निवडणुकीला 6 महिने बाकी असतानाच भाजपने सत्ताधारी बीआरएसवर हल्ले सुरू केलेले होते. मात्र, निवडणूक जवळ आली तशी बीआरएसच्या स्पर्धेत काँग्रेसने आगेकूच केली. मतदान जवळ आले तसे भाजपने लांब व वेगाने उडी घेत निवडणूक तिरंगी करून सोडली. काँग्रेसचे नेतृत्व राज्यात रेवंथ रेड्डींकडे आहे. सेनापती म्हणून लक्ष्मण आणि बंदी संजय यांच्या हाती भाजपची कमान आहे.
तेलंगणात काँग्रेस अगर भाजपला बहुमत मिळाले तर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे येईल, याबद्दल उत्सुकताही आहेच. काँग्रेस आणि भाजपने मैदानात पुरेपूर जोर झोकलेला असला तरी केसीआर यांच्या उंचीचा नेता या दोन्ही पक्षांकडे तूर्ततरी राज्यात नाही, ही गोष्ट मान्य करावीच लागेल. स्वतंत्र तेलंगणासाठी पंधरा वर्षे केसीआर यांनी आंदोलन चालविलेले आहे. 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगणाच्या स्थापनेनंतर केसीआर यांची लोकप्रियता आणखीच वाढलेली… 2 जून 2014 पासून आजतागायत केसीआर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. रायथू बंधू आणि रायथू भीमासारख्या योजनाही त्यांनी राबविल्या आहेत.
काँग्रेसमध्ये 5 दावेदार
काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून तूर्तास प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी आघाडीवर आहेत. माजी मंत्री के. जना रेड्डी, मल्लू भट्टी विक्रमार्क, माजी प्रदेश अध्यक्ष कॅप्टन एन. उत्तम कुमार रेड्डी, खासदार कोमाटिरेड्डी वेंकट रेड्डी आणि माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनरसिंहाही काँग्रेसकडून या पदाच्या स्पर्धेत आहेत. निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय आमदार मिळून घेतील, असे पक्षाकडून सांगण्यात येते. याउपर एकुणात ए. रेवंथ रेड्डी हे निवडणुकीदरम्यानच सर्वाधिक प्रबळ दावेदार ठरले आहेत.
भाजपकडून ओबीसी मुख्यमंत्री
विजयी ठरल्यास भाजप ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला मुख्यमंत्रिपद देणार आहे. तसे अधिकृतपणे जाहीरही झाले आहे. किंबहुना भाजपच्या प्रचारातील तो एक मुद्दाही होता. भाजपकडून मग चार नेते या पदाच्या स्पर्धेत असतील. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बंदी संजय, प्रदेश अध्यक्ष जी. किशन रेड्डी, भाजप ओबीसी मोर्चाचे नेता के. लक्ष्मण तसेच हुजुराबाद येथील आमदार इटाला राजेंद्र भाजपकडून या पदाच्या स्पर्धेत असतील. इटाला राजेंद्रही गजवेलमध्ये केसीआर यांना आव्हान देत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांच्यासाठी विजय आवश्यक आहे. अर्थात केसीआर यांची हॅट्ट्रिक होते की नाही, हे 3 डिसेंबरला कळेल आणि त्यावरच सारी दारोमदार आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या
सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. 30 नोव्हेंबरला राज्यातील 119 जागांसाठी मतदान होईल. 3 डिसेंबरला निकाल लागेल.
भाजपचे बंदी संजय प्रबळ दावेदार
बंदी संजय यांनी केसीआरविरोधात सतत लढा दिला. 120 दिवस 1500 कि.मी. पदयात्राही त्यांनी केलेली आहे. हैदराबाद महापालिकेत बंदी संजय यांच्या नेतृत्वाखाली 48 जागांवर विजय मिळाल्यानेही त्यांची स्थिती पक्षात मजबूत आहे. बंदी संजय पुन्हा एकदा करीमनगरमधून लढत आहेत.
काँग्रेसकडून रेवंथ रेड्डी दावेदार
रेवंथ रेड्डी हे कोडंगल आणि कामारेड्डी या दोन जागांवर लढत आहेत. कामारेड्डीत त्यांनी थेट केसीआर यांच्याविरुद्ध शड्डू ठोकलेले आहेत. केसीआर यांचा जर त्यांनी पराभव केला तर ते जायंट किलर ठरतील. पराभूत झाले तरी एका अर्थाने हा त्यांचा त्याग मानला जाईल.