पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या बेरोजगारीचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. येत्या दीड महिन्यात विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये सुमारे तीन लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या सरकार देणार आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात ६.५ लाख तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. (Rojgar Mela 2023)
पंतप्रधान मोदी गुरुवारी ११ व्या रोजगार मेळाव्यात ५० हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी धनत्रयोदशीपासून आतापर्यंत १० रोजगार मेळावे घेण्यात आले आहेत. डिसेंबरपर्यंत दहा लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ११ व्या रोजगार मेळाव्यानंतर सरकारने ७ लाख नियुक्ती पत्रांचे वाटप केलेले असेल. उर्वरित तीन लाख नियुक्तीपत्रे डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहेत. तसेच शेवटचा रोजगार मेळा जानेवारीमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. (Rojgar Mela 2023)
३० नोव्हेंबर रोजी आयोजित रोजगार मेळाव्यात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ५० हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे प्रदान करतील. या कालावधीत केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत देशभरात ३८ ठिकाणी नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. तरुणांना रेल्वे, गृह, आरोग्य मंत्रालय आणि उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागात नोकऱ्या दिल्या जातील. नितीन गडकरी नागपुरात, अनुराग ठाकूर शिमल्यात, अर्जुन मुंडा रांचीमध्ये उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीला रोजगार मेळावा सुरू झाला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी सुमारे ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. गेल्यावर्षी २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या मेळ्यात सुमारे ७१ हजार, यावर्षी २० जानेवारीला तिसऱ्या मेळ्यात ७१ हजार, चौथ्या मेळ्यात ७१ हजार, पाचव्या मेळ्यात ७० हजार, सहाव्या मेळ्यात ७० हजार, सातव्या मेळाव्यात ५१ हजार, नवव्या मेळाव्याला ५१ हजार तरुणांना तर दहाव्या रोजगार मेळाव्यात सुमारे ५० हजार तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले होते.
हेही वाचा :