पुढारी ऑनलाईन डेस्क : सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी ३६० डिग्री सेल्सिअसमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi tunnel rescue) बोगद्याच्या सर्व भागांकडून खोदकामावर विचार सुरू असून, मंगळवारी सकाळपर्यंत ५० मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे (उभा छेद) काम पूर्ण झाले आहे. बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचही काम सुरू असून त्याचा पहिला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
बोगद्यावरील टेकडीवरून व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी (उभा छेद) लष्करातील जवानांना पाचारण करण्यात आले आहे. मद्रासमधील लष्करातील इंजिनिअरिंग रेजिमेंटचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बोगद्याच्या वरून उभ्या ड्रिलिंगने मंगळवार सकाळपर्यंत आवश्यक असलेल्या ८६ मीटरपैकी ५० मीटर खोली गाठली आहे. गुरुवारपर्यंत खाली बोगद्याच्या वरच्या भागातून बाहेर पडल्यावर या एक मीटर रुंद शाफ्टमधून कामगारांना बाहेर काढण्याची आशा बचावकर्त्यांना आहे. सूक्ष्मबोगदा तज्ज्ञ ख्रिस कूपर यांनी सांगितले की, "काल रात्री व्यवस्थत खनन झालं. आम्ही ५० मीटर अंतर पार केले आहे. आता ५-६ मीटरचं अंतर पार करायचं आहे. काल रात्री आम्हाला कोणतेही अडथळे आले नाहीत."
दरम्यान, बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंगचही काम सुरू आहे. पाईप पुश करण्यासाठी ऑगर मशीनचा वापर केला जात आहे.
आपत्ती निवारण विभागाचे सदस्य (एनडीआरएफ) माजी लेफ्टनंट जनरल सैयद अता हैसनन यांनी बचावकार्य सुरळीत सुरू असून, चिंतेचे कारण नसल्याचे सांगितले. बोगद्यातील मजुरांना अन्न आणि औषधपुरवठा केला जात आहे. शिवाय, त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नातेवाईकांसह बचावकार्यातील अधिकारी मजुरांना धीर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव डॉ. पी. के. मिश्र यांनी सोमवारी बचावकार्याचा आढावा घेतला. (Uttarkashi Tunnel)
ऑडिओ कम्युनिकेशन सेटअप आणि बीएसएनएलच्या टेलिफोनिक कम्युनिकेशन्स सिस्टीमद्वारे बोगद्यातील मजुरांशी संपर्क साधून संवाद साधला जात आहे.