पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला वेग आला आहे. कामगारांना बाहेर काढण्याची मोहीम शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच हे कामगार सुखरूप बाहेर येतील. अशी आशा असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. (Uttarkashi Tunnel Rescue)
पुढे बोलताना मुख्यमंत्री धामी म्हणाले, पीएम मोदी बचावकार्यात येणाऱ्या अडचणींबद्दल सर्व अपडेट्स घेत आहेत. तसेच उपायांवर अधिकाऱ्यांशी चर्चाही करत आहेत. दरम्यान या मोहिमेत केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व एजन्सी युद्धपातळीवर कार्यरत आहेत. ४१ कामगारांच्या बचाव कार्यासाठी एकत्र काम करत आहोत. आम्हाला आशा आहे की, हे ऑपरेशन लवकरच पूर्ण होईल आणि सर्व कामगार लवकरच बाहेर येतील, असेही धामी म्हणाले. (Uttarkashi Tunnel Rescue)
बचावकार्याबाबत माहिती देताना तांत्रिक, रस्ते आणि वाहतूकीचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद यांनी म्हटले आहे की, बिघाड झालेले ऑगर ड्रिलिंग मशीन पुन्हा जोडण्यात आली आहे. वेल्डिंगनंतर बोगद्यात नवीन पाईप टाकण्यात आली आहे. दरम्यान, या प्रक्रियेला आणखी दोन तासांचा कालावधी लागणार असून, आता कोणताही अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही, अशी आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या बचावकार्यात प्रत्येकी ६ मीटर लांबीचे आणखी दोन पाईप टाकावे लागतील. पहिला ६ मीटर पाईप ५१ ते २५ मीटर अंतर पार करेल. तर दुसरी ६ मीटर पाईप बोगद्यात आतपर्यंत पोहचण्यात मदत करेल, असे देखील बोगदा बचाव कार्यातील सचिव महमूद अहमद यांनी बचावकार्याविषयी माहिती देताना स्पष्ट केले आहे.