पुढारी ऑनलाईन : भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी दोन महिन्यांच्या स्थगितीनंतर ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला भारताने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशनल कारणे' सांगून कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली होती. आता भारताने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु केली आहे. याबाबतचे वृत्त NDTV ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (India Canada News)
संबंधित बातम्या
दिल्लीत झालेल्या G20 परिषदेत भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानच्या मुद्द्यावर वादग्रस्त चर्चेनंतर द्विपक्षीय मतभेद वाढले होते. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (वय ४५) यांची जूनमध्ये कॅनडातील व्हँकुव्हर येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटाचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी होता. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान संबंध ताणले होते. या पार्श्वभूमीवर २१ सप्टेंबर रोजी भारताने व्हिसा सेवा स्थगित केली होती. पण आता पर्यटक व्हिसासह सर्व व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
बिझनेस आणि मेडिकल व्हिसासह चार सेवा गेल्या महिन्यांत सुरू करण्यात आल्या होत्या. गेल्या सप्टेंबरमध्ये भारताने कॅनेडियन नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत व्हिसा देण्याची प्रक्रिया स्थगित केली होती.
भारत सरकारने नेहमीच ठामपणे निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याच्या कॅनडाच्या आरोपांचे खंडन केले आहे आणि त्यांच्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी कॅनडाकडे पुरावे देण्याची मागणी केली होती.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच ब्रिटनमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, "आम्ही तपास करण्यास नकार देत नाही…. (परंतु) जर तुमच्याकडे (कॅनडा सरकारकडे) कारण असेल तर असा आरोप करा, कृपया पुरावे आम्हाला द्या. तुम्ही जे काही सांगाल त्याकडे आम्ही लक्ष देऊ." (India Canada News)
हे ही वाचा ;