सहकार भारतीतर्फे दिल्लीत २, ३ डिसेंबरला अधिवेशन

सहकार भारतीतर्फे दिल्लीत २, ३ डिसेंबरला अधिवेशन
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सहकारी क्षेत्रातील पतसंस्थांच्या समस्यांवर संघटीतपणे केंद्र सरकारला साकडे घालण्यासाठी सहकार भारतीतर्फे २ आणि ३ डिसेंबरला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर आणि राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी आज (दि.२१) दिल्लीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आले असून अधिवेशनात देशभरातून १० हजार प्रतिनिधी सहभागी होतील, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. या अधिवेशनादरम्यान प्रामुख्याने सर्व सहकारी पतसंस्थांना ठेवींवरील विमा संरक्षणाचा लाभ मिळावा, प्राप्तिकर कायद्यामध्ये सहकारी पतसंस्थांच्या व्याख्येचा समावेश करावा आणि प्राप्तिकरात सवलत मिळावी, केंद्रीय पातळीवर आणि राज्यांमध्येदेखील नव्या सहकारी पतसंस्थांची रखडलेली नोंदणी सुरू करावी, यासारख्या मागण्यांचा विचारविनिमय केला जाणार आहे.

कॅशलेस अथवा डिजिटल व्यवहारांमध्ये सहभागी होता यावे, यासाठी सहकारी पतसंस्थांना नॅशनल पेमेंट गेटवेचे सदस्यत्व मिळावे, पतमापनासाठी सीबील सारख्या व्यवस्थेचा लाभ सहकारी पतसंस्थांना देखील मिळावा, सक्षमपणे कर्ज वसुलीसाठी सहकारी पतसंस्थांना एसएआरएफ एएसआयच्या तरतुदी लागू कराव्यात, जेणेकरून कर्जवसुलीला मदत मिळेल, सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणुकीसाठी सहकारी पतसंस्थांना परवानगी मिळावी, मुद्रा योजनेसारख्या केंद्राच्या योजनांमध्ये सहकारी पतसंस्थांनाही सहभागी करून घेतले जावे, सहकारी पतसंस्थांच्या लेखापरिक्षणातील समन्वयासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर एकसमान निकष लागू करावेत, सहकारी पतसंस्थांच्या स्वनियमनाची यंत्रणा तयार केली जावी, या मागण्यांसाठी देखील सहकार भारती आग्रही असून त्यावरही या अधिवेशनात मंथन अपेक्षित आहे.

दरम्यान, सहकार क्षेत्रातील महिलांसाठी सहकार भारतीतर्फे तिसरे राष्ट्रीय महिला अधिवेशन १५ आणि १६ डिसेंबरला तेलंगना येथे होणार असल्याचे सहकार भारतीच्या राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news