पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील नूह येथे काही महिलांवर दगडफेक झाल्याची घटना काल (दि.१६) रात्री उशीरा घडली. या घटनेविरोधी लोकांनी निदर्शने केली आहेत. दरम्यान, पोलिसांनी हिंसाचारातील सहभागी व्यक्तींवर एफआयआर दाखल केले असून, या घटनेसंदर्भात तपास सुरू असल्याचे म्हटले आहे. (Nuh Violence)
हरियाणातील नूह येथे गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उशिरा काही उपद्रवी घटकांनी विहिरीचे पूजन करून येणाऱ्या महिलांवर दगडफेक केल्याची घटना उघडकीस आली. यात अनेक महिला जखमी झाल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण दोन समाजातील असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगडफेकीच्या घटनेविरोधात शुक्रवारी लोकांनी निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना शांत केले. (Nuh Violence)
मिळालेल्या माहितीनुसार, नूह येथील प्रभाग क्रमांक 10 मधील रहिवासी दयाराम यांचा मुलगा दीपू याला मुलगा झाला. हिंदू रितीरिवाजानुसार घरातील आणि आजूबाजूच्या काही महिला विहिरीची पूजा करण्यासाठी कैलास मंदिरात जात होत्या. घरातून बाहेर पडल्यावर कोणीतरी एक-दोन दगड फेकले. याकडे दुर्लक्ष करून महिला विहिरीची पूजा करण्यासाठी गेल्या. येत असताना पुन्हा शहरातील मोठ्या मदरशातून काही घटकांनी पुन्हा दगडफेक केल्याचा आरोप आहे. यामध्ये अनेक महिला जखमी झाल्या आहेत.
डीएसपी नूह वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, आम्ही याप्रकरणात एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे. या हिंसाचाऱ्याच्या घटनेक सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल. या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी करत येथील जनतेने विरोध केला आहे. त्यांची मागणी समजून घेत आम्ही या घटनेविरोधी कारवाई करत आहे. त्यामुळे मी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.